प्रत्येक स्त्री दुर्गेचं रूप- राणी मुखर्जी

महिला अत्याचार संदर्भात विशेष परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन.   

Updated: Dec 16, 2019, 04:55 PM IST
प्रत्येक स्त्री दुर्गेचं रूप- राणी मुखर्जी title=

नाशिक : देशातल्या कोणत्याच कोपऱ्यात आज महिला सुरक्षित नसल्याचं वास्तव समोर आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज महिला अत्याचार संदर्भात विशेष परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये असलेल्या शक्तीची आठवण राणी समस्त महिलांना करून देत आहे.

'महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे. फक्त प्रत्येक स्त्रीने ती ओळण्याची गरज आहे. पोलीस सगळीकडे उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला आपलं संरक्षण करता आलं पाहिजे.' यावेळेस तिने प्रत्येक महिला ही दुर्गेचं रूप असल्याचं सांगितलं. शिवाय ती प्रत्येक महिलेला 'शिवानी रॉय'सारखं जगायला सांगत आहे.

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या राणीच्या 'मर्दानी २' चित्रपटात ती एका निर्भीड शिवानी रॉय नावाच्या पोलिसांच्या भूमिकेत झळकत आहे. 'कोणी अत्याचार करत असेल, तर त्याच ठिकाणी त्याला मारा', असं आवाहन देखील तिने यावेळी केले.

'जे घडत आहे ते सांगायला लाजू नका किंवा घाबरू नका. भीती आणि लाज वाटते म्हणून गप्प बसू नका. आता वेळ गप्प बसण्याची नाही, तर निर्भीडपणे आवाज बुलंद करण्याची वेळ आहे.' त्याशिवाय मार्ग निघणार नसल्याचे वक्तव्य अभिनेत्री मुक्ता बर्वेने केले आहे.

पोलिसांचा नंबर लक्षात ठेवा आणि नराधमांना पोलीस स्टेशनपर्यंत घसरत घेऊन जाण्याचे आवाहन मुक्ताने केले. नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवाद कार्यक्रमात राणी आणि मुक्ता शिवाय पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल किरण बेदी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, दिग्दर्शक प्रवीण तरडे उपस्थित आहेत.