कोरोनामुळे राज्यातील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद

राज्यामध्ये आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या २२ वर गेली 

Updated: Mar 14, 2020, 06:11 PM IST
कोरोनामुळे राज्यातील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने दिला आहे. यामध्ये खासगी आणि सरकारी शाळांचा समावेश असेल. असे असले तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. काल पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद करण्याचा निर्णय झाला होता. राज्यातील शाळा बंद करण्यासंदर्भात वारंवार मागणी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्यामध्ये आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या २२ वर गेली आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले असले तरी एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तसेच २३ रुग्णांपैकी सर्वांचे सॅम्पल निगेटीव्ह आले आहेत. 

दहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिली आहे. आज नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या २४ तासात २३ सॅम्पल पाठवले होते, सगळे निगेटीव्ह आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आदेशाची अंमलबजावणी

शाळा, कॉलेज, जिम, स्विमिंग टेंक बंद ठेवण्याचा आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. शाळा कॉलेजला सुट्या दिल्या आहेत. याचा अर्थ त्यांनी कुठेही फिरायचे नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कॉलेजची होस्टेल रिकामी करण्याबतच्या सूचना आम्ही दिलेल्या नाहीत. तो निर्णय संबंशीत संस्थांनी घ्यावा असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले. 

कोरोनाची जगात दहशत दिसून येत आहे. जगात लाखो लोक या साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. तर ४००० पेक्षा जास्त लोकांचा आतार्पंयत मृत्यू झाला आहे. देशातही ८०च्या घरात बाधा झालेल्यांची संख्या गेली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातही १९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय घेण्याचे आवाहन आरोग्या विभाग आणि राज्य सरकारने केले आहे.