मुंबई : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाने त्यांना नगर मधून खासदारकी देण्याचे आश्वासनही दिले आहे. पण असे असताना राधाकृष्ण विखे यांची कॉंग्रेसमध्ये कोंडी झाली आहे. राधाकृष्ण विखे हे विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरू होती. पण राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर कोणतेही भाष्य केले नाही. पण या दरम्यान बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. बाळासाहेब थोरातांनी केलेल्या वक्तव्याचा यावेळी राधाकृष्ण यांनी समाचार घेतला. याला आता बाळासाहेब थोरात यांनी ही स्पष्टीकरण दिेले आहे. त्यामुळे विखे-पवार संघर्ष सुरू असताना राधाकृष्ण यांना पक्षांतर्गतच विखे-थोरात संघर्षाचाही सामाना करावा लागणार आहे.
बाळासाहेबांना उत्तर द्यायला ते काही पक्षश्रेष्ठी नाही आहेत. मी हाय कमांडशी बोलून पुढील वाटचाल कळवेल असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले होते. यावर आता बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी राधाकृष्ण यांच्यावर टीका केली नव्हती तर शंका व्यक्त केल्या अशी सफाई त्यांनी दिली. काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता प्रमुख नेत्याला जे बोलू शकतो तेच मी बोललो, त्या व्यतिरिक्त काही विचारण्याचा माझा हेतू नसल्याचेही बाळासाहेबांनी स्पष्ट केले. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या संघर्षाचा भाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राधाकृष्ण यांच्या पक्षनिष्ठेबद्दल मी प्रश्न उपस्थित केला नाही, लोकांमध्ये जो संभ्रम आहे तो दूर करा हे मी बोललो असे ते म्हणाले. राधाकृष्ण यांच्या पक्षनिष्ठेबद्दल सगळ्यांना माहित असल्याचेही ते म्हणाले.
सुजय याच्या भाजपा प्रवेशावरून बाळासाहेब थोरात यांनी विखेंवर टीका केली होती. विखे कुटुंबाला काँग्रेसने खूप काही दिले, त्यांच्या सगळ्या अपेक्षाही पूर्ण केल्या. सुजयच्या भाजपा प्रवेशानंतरही आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा न देण्याची भूमिका राधाकृष्ण यांनी घेतली आहे. त्यांनी काँग्रेसबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी असेही बाळासाहेब थोरात म्हणाले होते. राज्यात महत्त्वाची जबाबदारी विखे पाटील यांच्याकडे आहे. तसेच त्यांच्या पत्नी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देखील आहेत, याची आठवण करून द्यायला बाळासाहेब विसरले नाहीत.
सुजय यांच्या भाजपा प्रवेशाच्या निर्णयाचा राधाकृष्ण विखे यांनी सर्वप्रथम निषेध करायला हवा, असेही थोरात म्हणाले होते. 'भाजपाचे कमळ हातात येताच सुजय विखेंचे सूर बदलले आहेत. कधीकाळी भाजपवर टीका करणारे आता त्या त्यांची विचारधारा आवडल्याचे सांगताहेत. खरेतर मुलाने हट्ट केला होता तर वडिलांनी त्याला समजावायला हवे होते,' असा टोला त्यांनी विखेंना लगावला होता.