हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : कोरोनाचा फटका नाट्यसृष्टी प्रमाणे लोककला असलेल्या तमाशाला बसलाय. सरकारने यात्रा-जत्रा उत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला आणि याचा परिणाम तमाशा कलावंतांवर झालाय. तमाशा पंढरी ओळख असलेल्या नारायणगावात भारी ठरवण्यासाठी कोणीही फिरकत नसल्याने तमाशा फड मालक धास्तावले आहेत.
ग्रामीण भागात तमाशाचे फड लोकप्रिय आहे. गावच्या यात्रा जत्रांसाठी गावकरी लोककला करमणूकीचे कार्यक्रम म्हणून रात्री तमाशाचा कार्यक्रम ठेवतात. यावेळी कलाकारांसोबत तमाशा पाहायला आलेले प्रेक्षकही बेभान होतात. तमाशातील गाणी आणि विनोद यांना रसिक प्रेक्षक चांगली दाद देतात. मात्र यंदा फड रंगणं तर सोडाच पण कोरोनामुळे यात्रा जत्राच रद्द झाल्याने तमाशाला सुपारीच मिळत नसल्याने कर्ज काढून उभारलेला तमाशाचा फड चालवायचा कसा याच्या चिंतेने तमाशा कलावंत धास्तावलेत..
मात्रा हंगाम सुरू होण्याच्या काळात तमाशा पंढरी असलेल्या नारायणगाव गावात तमाशाची बारी ठरवण्यासाठी येणारे गाव पुढारी फिरकेणासे झालेत परिणामी फड मालकांनी थाटलेल्या राहुट्या ओस पडल्यात पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात यात्रा उत्सव सुरू होतात त्याआधी दरवर्षी साधारणपणे पंधराशे सुपारी बुक होतात.
त्यातून सुमारे दहा ते बारा कोटींची उलाढाल होत असते मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे तमाशाचाच तमाशा होऊन बसलाय. यात्रा जत्रा उत्सव बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आता फड मालक हातावर हात देऊन बसलेत.
एका तमाशा फडात दिडशे ते दोनशे कलाकार काम करत असतात यातुनच संसाराचा गाडा हाकला जातोय. तमाशाच्या माध्यमातून हजारो कुटूंब आपला उदर निर्वाह करतात. मात्र गेल्या चार वर्षापासुन तमाशाला ग्रहण लागलय. दुष्काळ, नोटबंदी, निवडणूका आणि आता कोरोना अशा संकटांनी तमाशा कलावंत पुरता हतबल झाला असून आता जगायचं कसं याची चिंता त्याला सतावतेय.
गेली शेकडो वर्षांची तमाशाची ही लोककला जोपासणाऱ्या कलाकारांची संकटे दुर होवोत आणि त्यांना ही चांगले दिवस यावेत यासाठी मायबाप सरकारने त्यांच्याकडे लक्ष देवून त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.