मुंबई : राज्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे ३५२ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे महाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा आकडा २,३३४ एवढा झाला आहे, तर २२९ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजच्या दिवसात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये मुंबईतले ९ रुग्ण तर पिंपरी-चिंचवडमधला १ आणि मीरा भाईंदरमधल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
आज झालेल्या मृत्यूंमध्ये ४ पुरुष आणि ७ महिला आहेत. मृत्यू झालेल्या ११ जणांपैकी ६ जण ६० वर्षांच्या वरचे आहेत. ५ रुग्ण ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यू झालेल्या ८ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे अतीजोखमीचे आजार होते. कोरोनामुळे राज्यात आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या १६० एवढी झाली आहे.
कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १,५४० एवढी झाली आहे, तर १०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, नंदूरबार याभागात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.