Corona : निजामुद्दीनमधल्या मरकजला पुण्याच्या १८२ जणांची हजेरी, १०६ जण सापडले

देशभरात कोरोनाचं संकट असताना निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातचा कार्यक्रम सुरू होता.

Updated: Apr 1, 2020, 05:20 PM IST
Corona : निजामुद्दीनमधल्या मरकजला पुण्याच्या १८२ जणांची हजेरी, १०६ जण सापडले title=
संग्रहित फोटो

पुणे : देशभरात कोरोनाचं संकट असताना निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात पुणे विभागातील १८२ जण गेले होते, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या १८२ जणांपैकी १०६ जण सापडले आहेत, तसंच उरलेल्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागातल्या १८२ जणांमध्ये पुणे जिल्ह्यातील १३६ जण, सातारा जिल्ह्यातील ५ जण, सांगली जिल्ह्यातील ३, सोलापूर जिल्ह्यातील १७ आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या २१ जणांचा समावेश आहे. सापडलेल्या १०६ जणांमध्ये पुणे जिल्ह्यातील ७०, साताऱ्यातील ५, कोल्हापुरातील १० आणि सांगली सोलापुरातील नागरिकांचा समावेश आहे.

निजामुद्दीन मरकजहून परत आलेल्या १०६ जणांचे स्त्रावनमुने घेतले जातील. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल, असं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं.

प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार ५१ व्यक्तींच्या कॉल रेकॉर्डनुसार ते बाहेरच्या राज्यातील असण्याची शक्यता आहे. काही जणांनी मोबाईल सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. काही राज्यांच्या किंवा इतर जिल्ह्यात ज्यांचे संपर्क आढळून आले, त्याची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया म्हैसेकर यांनी दिली.

पुण्यातले ५१ जण हे इतर राज्यातले असल्याची माहिती आहे, याबाबत अजून खात्री केली जात आहे. पुणे विभागातल्या १८२ जणांना ते जिकडे असतील तिकडेच क्वारंटाईन केलं जाणार आहे. या सगळ्यांच्या चाचण्याही तिकडेच होतील. चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल, असंही म्हैसेकर यांनी सांगितलं.

पुण्याशिवाय निजामुद्दीनमधल्या या मरकजला नागपूरमधून ५४ जण, नाशिकमधून २१ जण, औरंगाबादमधून ४३ जण, अहमदनगरमधून ४६ जण, यवतमाळमधून १२ जण, चंद्रपूरमधून ४९ जण, नांदेडमधून १३ जण, रत्नागिरीमधून ८-१० जण आणि वर्ध्याचे ८ जण गेले होते.

तर हिंगोलीहून गेलेले सगळे ११ जण अजून दिल्लीमध्येच आहेत. नवी मुंबईहून गेलेल्या १५ जणांपैकी १२ जण दिल्लीत आहेत, तर ३ जणांना नवी मुंबईमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे.