मुंबई : राज्यात कोरोनाचे थैमान दिसून येत आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची संख्या (Coronavirus in Ratnagiri) दिवसागणिक वाढत जात असल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कडक लॉकडाऊनचे ( lockdown in Ratnagiri ) आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. जिल्ह्यात औषधे दुकान वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच कोविड 19 च्या तपासणी पथकात वाढ केली आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या आणि रस्त्यावर फिरणाऱ्यांची तात्काळ कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शहरात महत्वाच्या तीन ठिकाणी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच मोबाईल पथकही कार्यरत आहे. रेल्वे स्टेशन येथेही कोविड पथक नेमण्यात आले आहे. (Coronavirus : Strict lockdown in Ratnagiri district)
राज्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना 72 तासांपूर्वीचे RT- PCR Test बंधनकारक करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काल 515 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापलेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15075 वर पोहोचली आहे. काल 167 कोरोनाचे रुग्ण बरे झाले. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषदेने कोविड-19च्या तपासणी पथकात वाढ केली आहे. ही पथके शहरात शुक्रवारपासून सर्वत्र कार्यरत झाली आहेत.
रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने कोरोनाच्या तपासणीच्या पथकात वाढ केली आहे. ही पथके शहरातील रेल्वे स्टेशन, रहाटाघर बस्थानक, मारुती मंदिर सर्कल आणि शिर्के स्कूल येथे सुरु केली आहेत. त्याशिवाय मोबाईल पथकाच्यामाध्यामातूनही रुग्णांची तपासणी करण्यात येत आहेत. नवीन अशी चार पथकांची यात वाढ करण्यात आली आहे. नागरिकांनी या ठिकाणी तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
दरम्यान, मुंबईतील परिस्थिती बिकट असल्याने कोकणात येणाऱ्यांची कोरोना टेस्ट होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कराेना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. राज्याप्रमाणे मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक कोकणवासीय परत आपल्या गावाकडे येत आहेत. यामुळे आता प्रशासनानेदेखील कडक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
कोकण रेल्वेने येणार्या प्रवाशांची देखील तपासणी करुन कोराेना टेस्ट घेण्यात येणार आहे. तसेच अनेक जण मोठ्या प्रमाणावर खासगी गाड्या घेऊन कोकणात दाखल होत असल्याने आता प्रशासनाने जिल्ह्यात येणाऱ्या प्रवेशद्वारावर तपासणी केंद्रे सुरु केली आहेत. मुंबईतून येणारे चाकरमानी कशेडी घाटामधून जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याने त्या ठिकाणीदेखील कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.