मुंबई : सरकारने नियमावली आखून मंदिर खुली केली नाहीत तर आदेश झुगारुन मंदिर प्रवेश करु असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलायं. सरकारला मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला विचारलाय. दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असताना नेमकं महाराष्ट्रातच मंदिर का बंद ठेवली जात आहेत ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
मंदिर हा भक्ती पुरता विषय नाही यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मॉल,सार्वजनिक कार्यक्रम यासाठी जसे निर्बंध आहेत तसे मंदिराबाबत ही असू द्या. सरकारने लवकर सकारात्मक पाऊल उचलले नाही तर सरकारच्या आदेशाना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल.
सरकारच्या डोळ्यावर गुंगीची झापड आल्याने त्यांना हिंदू भाविकांचा कंठशोष दिसत नसल्याची टीका राज ठाकरेंनी केलीय. मंदिर सुरु करणं हा विषय केवळ देवापुरता मर्यादीत नाही. याला जोडून देखील एक अर्थव्यवस्था असते. मंदिरात सेवा करणारे पुजारी, गुरव हे त्यावर अवंलंबून असतात.
सर्वात शेवटी मंदिर उघडून सरकारने उगीच पुरोगामीत्व दाखवू नये. त्याआधीच नियमावली आखून हिंदुंच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा.