Covid Scam : मुंबई महापालिकेतील (BMC) कोविड घोटाळ्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकीकडे ईडीने (ED) या प्रकरणाची चौकशी सुरु केलेली असताना आता चौकशीचे धागेदोरे पुण्यापर्यंत (Pune) पोहोचण्याची शक्यता आहे. कोविड काळात लाईफ लाईन संस्थेमार्फत नियुक्त करण्यात आलेले डॉक्टर हे पात्रच नसल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळेच अनेक रुग्णांचे जीव गेल्याने अनेकांनी पुणे पोलिसांकडे अनेक तक्रारी केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात ईडीसोबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मुंबईतही लाईफ लाईन संस्थेमार्फत अपात्र डॉक्टरांची भरती केल्यानंतर पुण्यातही याचे संबंध समोर येत आहेत. पात्रता नसतानाही कोरोना काळात या डॉक्टरांची भरती करण्यात आली होती. तसेच या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि घोटाळा झाल्याचे समोर आले होते. मात्र हे डॉक्टर कुठून आले आणि त्यांच्या उपचारामुळे किती रुग्णांचा मृत्यू झाला याची चौकशी केली जाणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भातील काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
कोरोना काळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर्स उभारताना 38 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. कॅगनेदेखील कोविड काळातील मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह करत अहवाल सादर केला होता. त्यानंतर याप्रकरणी ईडीने मुंबईत १४ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते. तसेच मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी व्हायला हवी यासाठी महाराष्ट्र सरकारने 19 जून रोजी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची घोषणा केली होती.