सांगली : फळ मार्केटमध्ये नियम धाब्यावर बसवत आंबा खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सोशल डिस्टनसिंगची पायमल्ली होत असल्याने पोलिसांनी अखेर हस्तक्षेप करत सांगली फळमार्केटमधील आंबा विक्री बंद केली. त्याऐवजी आंबा मार्केट अंकली रोडवरील एका मंगल कार्यालया समोर स्थलांतर केले आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मार्केट स्थलांतर केल्याने व्यापाऱ्यांनी आंबा विक्री करण्यास पाठ फिरविली आहे. केवळ एकाच व्यापाऱ्याकडून आंबा विक्री सध्या सुरु आहे. फळ मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच पोलिसांकडून वारंवार नियमांचे पालन करा, असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तर आंबा विक्री बंद असल्याने फळ मार्केटमध्ये आता शुकशुकाट दिसून येत आहे. फळ मार्केटमध्ये आंबा खरेदीसाठी लोकांची पुन्हा गर्दी होऊ नये म्हणून अन्य जागेत आंबा मार्केट स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती सांगली पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी दिली.
राज्यशासनाने २० एप्रिलपासून उद्योग-धंदे सुरु करण्यासाठी थोडी सूट दिली आहे. मात्र, लॉकडाऊन आणि संचारबंदी शिथिल केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. तसे आवाहन जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांकडून करण्यात येत आहे. खरेदीसाठी गर्दी करु नका, आवश्यता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र, नागरिक या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे या गर्दीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता कोठोर कारवाईचा इशारा दिला आहे.