सांगली, परभणीत कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सांगली आणि परभणी या जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.  

Updated: May 30, 2020, 09:53 AM IST
सांगली, परभणीत कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू   title=
संग्रहित छाया

सांगली / परभणी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सांगली आणि परभणी या जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील हा  चौथा बळी आहे. तर परभणीतील दुसरा बळी आहे. सांगलीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सांगलीतील कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. नेर्ली येथील ५७ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित होता. मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. या रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णाला नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना मधुमेह होता. 

दरम्यान, ही व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली होती. या रुग्णाचा मृत्यू झाला आहे . सांगली जिल्ह्यात आज आखेर मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे. सध्यस्थितीला सांगली जिल्ह्यात ५० जण कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत. 
 तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०९ रुग्ण आहेत.

 तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा मृत्यू झाला आहे. वाघी बोबडे येथील रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. ६० वर्षीय वृद्ध हे कोरोना बाधित असल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले होते. ते रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून परभणीत आले होते.

दरम्यान, त्यांच्यावर ह्रदय विकारावरचे उपचार सुरु होते. ते कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या संपर्कात अनेक जण आल्याची माहिती पुढे आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणनेला या व्यक्तींचा शोध घ्यावा लागणार आहे. परभणी जिल्ह्यात ७४ कोरोना रुग्ण असल्याची नोंद आहे. दरम्यान, दोघांचा मृत्यू झाला असून एक जण कोरोनामुक्त झाला आहे.