रत्नागिरी : राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून ठिकठिकाणी दरडी कोसळून अनेकांचे बळी घेतले आहेत. रायगडच्या महाडमध्ये तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली असून ढिगाऱ्याखाली अद्याप 20 ते 30 जण अडकून पडले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. NDRFनं मदत आणि बचावकार्य सुरू केलं असून आतापर्यंत 44 जणांचे मृतदेह हाती आलेत. काल संध्याकाळच्या सुमारास 80 कुटुंबांच्या या वाडीवर दरड कोसळली होती. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
दुसरीकडे खेडमध्ये पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळली आहे. इथं 17 लोक दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोसरे-बौद्धवाडी इथं एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू असून आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. खेडच्या पोसरे खुर्द बौध्दवाडीमध्ये काल रात्री अचानक डोंगर खचून 18 घरांवर दरड कोसळली. त्यामध्ये एकूण 17 जण गाढले गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देणयात आलीय.
रायगड जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे काल महापारेषणच्या कांदळगाव ते महाड दरम्यान 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्यामुळे महावितरणच्या गोरेगाव विभागातील महाड आणि पोलादपूर उपविभाग पूर्णपणे अंधारात गेले आहेत. दोन्ही तालुक्यात 80 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित असून अति उच्चदाब टॉवरच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. टॉवर लाईनचे काम पूर्ण होईपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात वेळ लागू शकतो.