धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी राजीनामा...'

Ajit Pawar on Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं असून चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 28, 2025, 06:20 PM IST
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी राजीनामा...' title=

Ajit Pawar on Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damani) यांनी सोमवारी अजित पवार यांची भेट घेत ही मागणी केली. तसंच राजीनामा घेतला नाही तर कोर्टात जाऊ असा इशाराही दिला आहे. कोणाचा संबंध असेल तर कारवाई करु अशी आमची भूमिका असल्याचं अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे. 

"अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रं माझ्याकडे दिली, ती मी पाहिली. मी आज कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटणार होतो. फोनवरुन आमचं बोलणं झालं होतं, समोरासमोर बोलणं झालं होतं. आज ते नागपूरला जाणार होते. त्यांनी मला चेंबरमध्ये बोलावून भेटूया असं सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की, अंजली दमानिया मलाही भेटल्या असून काही कागदपत्रं दिली आहेत. त्यांनी सांगितलं की, एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन अशा तीन चौकशा सुरु आहेत. हे पुरावे एसआयटी, सीआयडीकडे दिले आहेत. त्याबद्दलची वस्तुस्थिती काय पुढे येते त्यानुसार निर्णय घेतला जाईल," असं अजित पवारांनी सांगितलं आहे. 

'मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, अजित पवारांनीच....', धनंजय मुंडेंचा उल्लेख करत सुरेश धस स्पष्टच बोलले, 'आकाचा आका...'

 

"जी काही घटना बीडमध्ये घडली आहे, त्यासंबंधी चौकशी सुरु आहे. चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत. आणखी काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पण जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. पण जर संबंध असेल तर निश्चित कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही. हीच भूमिका मुख्यमंत्र्यांसह आमची आहे," असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. माझ्यावेळी जे काही झालं होतं ते असह्य झाल्यामुळे राजीनामा दिला होता. चौकशी सुरु असून, दोषी आढळलं तर त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही असंही ते म्हणाले. 

'45 कोटी, राखेचे साठे अन् करुणा मुंडे...'; मुख्यमंत्री भेटीत सुरेश धस यांचे गौप्यस्फोट; केल्या 6 मोठ्या मागण्या

"सुरेश धसला काय वाटतं त्याच्या मला काही देणंघेणं नाही. मी सरकारमध्ये भाजपाबरोबर आहे. मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करुन महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं असा प्रयत्न असतो. एकनाथ शिंदेंची यात महत्त्वाची भूमिका आहे. निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसून निर्णय़ घेतो. जर वेगवेगळ्या पक्षातील खालचे कार्यकर्ते बोलू लागले तर त्याला काही अंतच उरणार नाही. जी काही भूमिका असेल तर अमित शाह, देवेंद्र फडणवीस, जे पी नड्डा, चंद्रशेखर बावनकुळे सांगतील," असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. 

'तुमचा बाप इथं बसलाय...', वाल्मिक कराडची पोलीस अधिकाऱ्यासोबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

"मी उद्या रात्री संभाजीनगर आणि तिथून बीडला जाणार आहे. अर्धा दिवस बीडला आहे. तेथील पालक सचिव वाघमारे यांनाही येण्याची सूचना केली आहे. संध्याकाळी पुण्यात बैठकीसाठी येणार आहे," अशी माहिती अजित पवारांनी दिली. नाना पटोले यांनी आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे की नाही याबाबत फुकट सल्ला देऊ नये असंही ते म्हणाले आहेत. 

मी वरिष्ठ पातळीवर सर्वांच्या संपर्कात आहे. खालचे लोक काय बोलतात यावर उत्तर देण्यास बांधील नाही असं त्यांनी सांगितलं आहे. कोणाला पाठीशी घालणार नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माझा स्वभाव आणि कामाची पद्धत माहिती आहे असंही ते म्हणाले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x