'निर्बंध हटणार नाहीत कोल्हापूरकरांनी काळजी घ्यावी!'

राज्यातली कोरोनाची परिस्थिती सुधारली पण कोल्हापुरातली हाताबाहेर

Updated: Jun 14, 2021, 02:23 PM IST
'निर्बंध हटणार नाहीत कोल्हापूरकरांनी काळजी घ्यावी!' title=

प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर: राज्यात कोरोनाची आकडेवारी आटोक्यात येत असताना कोल्हापुरातील परिस्थिती मात्र गंभीर आहे. याच पर्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये नियम शिथिल होत असताना मात्र कोल्हापूरकरांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर कोल्हापुरात निर्बंध शिथिल होणार नसल्याचंही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

कोल्हापुरात निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत. हे निर्बंध कडकच राहाणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. याशिवाय नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. पॉझिटिव्हिटी रेटनुसार रुग्णांचं सर्वाधिक प्रमाण हे कोल्हापुरात आहे. त्यामुळे होम क्वारंटाइनची सुविधा कमी करून क्वारंटाइन सेंटरवर जास्त भर देण्यात येईल असंही यावेळी अजित पवार म्हणाले. 

कोरोनाच्या टेस्टिंग दीडपट करण्याच्या अधिका-यांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. 24 तासांत तब्बल 1586 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार, राजेश टोपे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.