'संभाजी भिडेंचा भाजपशी संबंध नाही', देवेंद्र फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

Sambhaji Bhide Controversial Statement: संभाजी भिडेंचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतंत्र संघटना चालवतात असेही फडणवीस म्हणाले. याला जाणिवपूर्वक राजकीय रंग देण्याचा काहीच अर्थ नसल्याचे ते म्हणाले.

Pravin Dabholkar | Updated: Jul 30, 2023, 01:49 PM IST
'संभाजी भिडेंचा भाजपशी संबंध नाही', देवेंद्र फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा title=

Devendra Fadnavis Reaction On Sambhaji Bhide: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान केले. याचा राज्यभरातून निषेध होत आहे. राज्य सरकारने संभाजी भिडेंवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारचे वक्तव्य कुणीच करु नये आणि भिडे गुरुजींनीही करु नये. यामुळे लोकांमध्ये संताप तयार होतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दरम्यान यासंदर्भात उचीत कारवाई राज्य सरकार करेल, असेही ते यावेळी म्हणाले.  महात्मा गांधीबद्दल अपमानकारक वक्तव्य कुणीही करु नये. भिडेंच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले. 

तसेच भिडेंचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतंत्र संघटना चालवतात असेही फडणवीस म्हणाले. याला जाणिवपूर्वक राजकीय रंग देण्याचा काहीच अर्थ नसल्याचे ते म्हणाले.

याचा निषेध करत कॉंग्रेसची लोकं रस्त्यावर उतरतात. जेव्हा राहुल गांधी सावरकरांवर खालच्या पातळीवर जाऊन टिका करतात, तेव्हादेखील निषेध व्हायला हवा, असे ते म्हणाले. 

काय आहे वाद?

संभाजी भिडे यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अमरावतीमध्ये बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम या सभागृहातील कार्यक्रमातील ही क्लिप असल्याचे बोलले जाते. या कार्यक्रमातील संभाजी भिडे महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह दावे केल्याचे ऐकायला मिळत आहे. 

मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. तीन वर्ष करमचंद फरार होते, याचा काळात मोहनदास यांचा जन्मा झाला,असे या क्लिपमध्ये ऐकू येत आहे. 

तसेच त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ आणि शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचेही क्लिपमध्ये पुढे म्हटले आहे. संभाजी भिडेंच्या या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध होत आहे. 

विधानसभेतदेखील या मुद्द्यावरुन खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात संभाजी भिडे यांच्यावर आगपाखड करत त्यांच्या अटकेची मागणी केली.