मोदींच्या पाय पडतात, त्यांना बॉस म्हणतात... उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर प्रत्युत्तर

देशभरातील विरोधक पाटण्याला एकत्र येणार आहेत, हातात हात घेणार आहेत आणि 'मोदी हटाओ'च्या घोषणा देणार आहेत. आता त्यांच्यात एक नेता वाढला आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे. मात्र कितीही वेली एकत्र आल्या तरी त्या वटवृक्ष होऊ शकत नाही. वटवृक्ष एकच असतो त्याचं कुणीही वाकडं करु शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

Updated: Jun 18, 2023, 11:01 PM IST
मोदींच्या पाय पडतात, त्यांना बॉस म्हणतात... उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर प्रत्युत्तर   title=

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : ठाकरे गटाच्या शिवनेच्या राज्यव्यापी शिबीरात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांना थेट आव्हान दिले. पंतप्रधान हा देशापेक्षा मोठा नसतो. देशाची ओळख भारत, हिंदूस्थान आणि भारतीय अशी झाली पाहिजे. भारतीयांची ओळख मोदींचा अंध भक्त अशी होता कामा नये असे  उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत प्रत्युत्तर दिले आहे. कोण होतास तू... काय झालास तू... अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  जे घरी बसतात  त्यांना अमित शहा काय माहिती? जे घरात बसून राजकारण करतात त्यांना मोदी काय माहिती असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

अमेरिकेला जाण्यापेक्षा विश्वगुरूंनी मणिपूरला जाऊन दाखवावं, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. आता यावरुनच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. फडणवीसांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झालीय असा घणाघात उद्धव ठाकरेंनी वरळीच्या महाशिबिरातून केला. त्यावर फडणवीसांनी अकोल्याच्या जाहीर सभेतून प्रत्युत्तर दिलं. उद्धवजी तुम्हाला कुठे आग होतेय हेमाहितीय असा पलटवार फडणवीसांनी केला. 

परदेशात मोदीजींमुळे भारताला सन्मान मिळाला

कोरोना काळात मोदींजीनी आपल्या देशात लस तयार केली. मोफत लस दिली म्हणून आपण जिवंत आहोत. मोदीजींनी 100 देशांना लस दिली. 100 देशांचे नेते मोदींचे आभार मानतात. आमचा देशात जिवंत आहे तो मोदींमुळे असे म्हणतात. अमेरिके सारख्या बलाढ्य देशाचे राष्ट्रपती म्हणतात मोदीजींची सिग्नेचर मला घ्यायची आहे त्यांची सही घ्यायची आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मोदींना बॉस म्हणतात. पापुआ न्यू गिनी देशाचे नेते  मोदीजींच्या पाया पडतात. 120 देशांचे राष्ट्रपती एकत्रित येऊन म्हणतात मोदीजी जगामध्ये आमचे नेतृत्व करतात. हा मोदींचा सन्मान नाही तर भारताचा सन्मान आहे.  

बाळासाहेबांची शिवसेना आम्ही जिवंत केली

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच आम्ही त्यांचं दुकान बंद केलं असा टोला त्यांनी लगावला. त्याचवेळी मी पुन्हा आलो, येताना शिंदेंनाही घेऊन आलो आणि बाळासाहेबांची शिवसेना जिवंत केली अशी फटकेबाजीही फडणवीसांनी केली.

अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानांवर मोदी महाजन संपर्क अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्ती निमित्त राज्यभरात लोकसभा, विधानसभा 2024चं लक्ष ठेऊन सभा आयोजित करण्यात येत आहे. अकोल्यातील या सभेत राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा गट नेता प्रवीण दरेकर सोबतच नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले आशिष देशमुख सुद्धा उपस्थित होते.