आई तुळजाभवानीचे 204 किलो सोने अन् 3 टन चांदीचे दागिने वितळवणार!

Tuljapur Tulja Bhavani temple : राज्य शासनाच्या परवानगीनंतर आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावानीचे दागिने वितवळवण्यात येणार आहे. मंदिर संस्थानने परवनगी मागितल्या नंतर सरकारने दागिने वितवळण्यास मंजुरी दिली आहे. 

आकाश नेटके | Updated: Oct 6, 2023, 11:49 AM IST
आई तुळजाभवानीचे 204 किलो सोने अन् 3 टन चांदीचे दागिने वितळवणार!

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (tulja bhavani) चरणी मोठ्या श्रद्धेने अर्पण केलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण करण्यात आलेले सोन्या - चांदीचे दागिने आता वितळवण्यात येणार आहे. भक्तांनी तुळजाभवानाली (Tuljapur) अर्पण केलेले दागिने वितळवण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या निर्णयाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.

Add Zee News as a Preferred Source

विधी व न्याय विभागाने दिलेल्या मंजुरीनुसार देवीला अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांपैकी 204 किलो सोने तर 3000 किलो चांदीचे दागिने वितळविले जाणार आहेत. जानेवारी 2009 ते जून 2023 या कालावधीमध्ये देवीच्या चरणी अर्पण केलेले दागिने वितळे जाणार आहेत. भक्तांनी देवीला अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू वितळवून त्या बँकेत ठेवण्याचा ठराव तुळजाभवानी मंदिर समितीने घेतला होता. त्यानंतर समितीने हे दागिने वितळवता यावेत याची रीतसर परवानगी राज्य सरकारकडे मागितली होती. त्यानुसार राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने गुरुवारी ती परवानगी तुळजाभवानी मंदिर संस्थानाला दिली आहे. त्यामुळे आता तुळजाभवानी देवीच्या दैनंदिन व यात्रा काळात वापरायचे दागिने पुरातन व दुर्मिळ दागिने वगळून केवळ भाविकांनी देवीला अर्पण केलेलेच दागिने वितळविले जाणार आहेत.

शुद्धता तपासली जाणार

महाराष्ट्रासह देशभरातून भाविक तुळजाभवानीचे चरणी दर्शनासाठी येतात आणि मोठ्या भक्ती भावाने देवीला सोने-चांदीचे दागिने अर्पण करतात मात्र भक्तांनी अर्पण केलेले दागिने प्रत्येक वेळेस शुद्धच असते असे नाही आता हे दागिने वितळवले जाणार असल्यामुळे या दागिन्यांची शुद्धता तपासली जाणार आहे. तसेच वितळवून शुद्ध केलेले हे दागिने रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ठेवले जाणार आहेत. यातून मंदिर संस्थानला मोठे उत्पन्न मिळणार आहे. तर दुसरीकडे भक्तांनी मोठ्या श्रद्धेने अर्पण केलेले हे मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने बँकेत सुरक्षित राहणार आहेत.

साईबाबा संस्थान व सिद्धिविनायक गणपती ट्रस्टच्या वतीने हे भक्तांनी अर्पण केलेले मौल्यवान दागिने वितळवले जातात. त्यानंतर ते रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ठेवी म्हणून ठेवले जातात. त्याच पद्धतीने तुळजाभवानी मातेचे हे वितळलेले दागिने ठेवले जाणार आहेत यासाठी शासनाने काही नियम व अटी देखील घातल्या आहेत. सध्या आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव जवळ आला आहे त्यामुळे हे सोन्या चांदीचे दागिने या उत्सवानंतर वितळवले जाणार असल्याचे मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा धाराशीचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितले आहे.

About the Author