बहिणीला वाचवण्यासाठी भावांनी घेतली तलावात उडी; खोल पाण्यामुळे तिघांचाही गेला जीव

Ahmednagar News : अहमदनगरच्या खर्डा येथे तलावात बुडून तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खर्डा येथे शोककळा पसरली आहे. मुलांना वाचवण्यासाठी आईने देखील पाण्यात उडी घेतली होती. मात्र तिला स्थानिकांनी पाण्याबाहेर काढल्याने तिचा जीव वाचला.

आकाश नेटके | Updated: Oct 6, 2023, 09:23 AM IST
बहिणीला वाचवण्यासाठी भावांनी घेतली तलावात उडी; खोल पाण्यामुळे तिघांचाही गेला जीव title=

लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar News) येथून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. अहमदनगरच्या खर्डा (Kharda) येथे तीन भावंडांचा तळ्यात (lake) बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटेनेमुळं परिसरात शोककळा पसरली आहे. बुडणाऱ्या बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्न दोन्ही भावंडांनी केला होता. मात्र तिघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Ahmednagar Police) घटनास्थळी धाव घेऊन घटनेची नोंद केली आहे.

अहमदनगरच्या खर्डा येथे तलावात बुडून तीन भावंडांचा मृत्यू झाला आहे. सानिया सुरवसे, कृष्णा सुरवसे आणि दीपक सुरवसे असे या तिघांची नावे असून सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे खर्डा गावामध्ये शोककळा पसरली आहे. खर्डा येथील हे बहिण भाऊ त्यांची आई रुपाली हिच्या सोबत कपडे धुण्यासाठी भूम कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या तलावात गेले होते. त्याचवेळी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला.

आई कपडे धूत असताना तिघेही भांवडे पाण्यात उतरली होती. मात्र तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने सानिया पाण्यात बुडू लागली. सोनियाला वाचवण्यासाठी दीपक आणि कृष्णा हे दोघे देखील खोल पाण्यात गेले. मात्र सोनियाला वाचवण्याच्या प्रयत्नात दीपक आणि कृष्णाही बुडाले. हा सगळा प्रकार त्यांची आई रुपाली यांनी पाहिली. त्यांनीही थेट तळ्याच्या पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने रुपाली देखील बुडू लागल्या. तलावाशेजारुन जाणाऱ्या वाटसरुंनी हा प्रकार पाहिला आणि रुपाली यांना बाहेर काढलं. त्यामुळे रुपालीचाच जीव वाचला. मात्र सोनिया, दीपक आणि कृष्णा तिघेही बुडाले. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.