पूजा खेडकरासंमोर आता नवी अडचण! बनावट प्रमाणपत्रं, ओबीसी कोटा, अपंगत्व यानंतर आता नावात आढळली विसंगती

IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात जाताना दिसत आहे. याचं कारण आता पूजा खेडकर यांच्या नावात विसंगती दिसून आली आहे. त्यामुळे नावातील बदल करताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं होतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 16, 2024, 03:27 PM IST
पूजा खेडकरासंमोर आता नवी अडचण! बनावट प्रमाणपत्रं, ओबीसी कोटा, अपंगत्व यानंतर आता नावात आढळली विसंगती

IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात जाताना दिसत आहे. याचं कारण आता पूजा खेडकर यांच्या नावात विसंगती दिसून आली आहे. 2019 मध्ये युपीएससी परीक्षा दिली तेव्हा आणि 2021 च्या यादीतील नावात फरक दिसत आहे. त्यामुळे नावातील बदल करताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं होतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान यामुळे पूजा खेडकर यांच्यासमोर नव्या अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पूजा खेडकरांच्या नावात देखील विसंगती दिसून येत आहे. 2019 ला युपीएससी परीक्षा दिली, तेव्हा यादीमध्ये त्यांचं नाव खेडेकर पूजा दिलीपराव असं आहे. शिवाय आडनावाने सुरुवात आहे. त्याचप्रमाणे दिलीपराव या नावात इंग्रजी स्पेलिंग Deeliprao असं लिहिण्यात आलं आहे. 

तुम्ही वेगवेगळ्या नावाने परीक्षा दिली? IAS पूजा खेडकर अखेर सविस्तर बोलल्या, 'असा कोणता व्यक्ती...'

दरम्यान 2021 ची यादी पाहिल्यास त्यात त्यांचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं आहे. म्हणजे आडनाव शेवटी आहे. वडिलांच्या नावाआधी आईच म्हणजेच मनोरमा नाव आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे वडिलांच्या नावाची स्पेलिंग dilip लिहिण्यात आली आहे. आता नावातील हे बदल का करण्यात आले? ते करत असताना आवश्यक प्रक्रिया म्हणजे प्रतिज्ञापत्र किंवा कोर्ट ऑर्डर आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

माझी मानहानी होत आहे - पूजा खेडकर

"जे काही सत्य आहे ते समोर येईल, काही लपवलेलं नाही. सरकारने गठीत केलेल्या समितीशी जो काही संवाद साधला जातो त्यात गुप्तता पाळली जाते. यामुळे ते लोकांशी, मीडियाशी शेअर करु शकत नाही. सर्व चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. जी काही कागदपत्रं, माहिती मी दिली आहे त्यासाठी समिती आहे. तज्ज्ञ यासंबंधी निर्णय घेतली आणि त्यासाठी आपण वाट पाहिली पाहिजे. आपण त्याचा आदर करायला हवा," असं आवाहन पूजा खेडकर यांनी वाशीममध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे. 

खोट्या प्रमाणपत्रांच्या आरोपावर IAS पूजा खेडकरांनी अखेर मौन सोडलं, 'मला दोषी ठरवणं...'

"आता जर तुम्ही म्हणत आहात तर कमिटीसमोर सगळं सत्य येईलच. दररोज नव्या फेक गोष्टी समोर येत आहेत. फेक न्यूज दिल्या जात आहेत. असा कोणता व्यक्ती असतो ज्याचं रोज काही नवीन असतं. खोटी माहिती पसरवली जात आहे. माझी फार मानहानी होत आहे. मीडियाने जबाबदारीने वागायला हवं. माझा मीडियावर विश्वास आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असताना जी काही माहिती आहे, ती खोटी म्हणून पसरवू नका," असंही त्यांनी म्हटलं.

"जी काही माहिती आहे त्यात छेडछाड होऊ नये यासाठीच ती जाहीर केली जात नाही. कोणीही मध्यस्थीचा प्रयत्न करु नये यासाठीच ती दिली जात नाही. जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी स्वत: तुम्हाला त्याची कॉपी देईन," असंही त्या म्हणाल्या. पोलीस आले नव्हते, मी त्यांना बोलावलं होतं. माझं त्यांच्याकडे काम होतं. पोलीस कोणत्याही तपासासाठी आले नव्हते असा दावा यावेळी त्यांनी केला. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More