कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील

कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.  

Updated: Oct 10, 2020, 03:37 PM IST
कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. त्यासाठी दोन वर्षांचा अभ्यासक्रम क्लब करावा, असे त्यांनी सुचवले आहे. कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ८ मुद्दे सुचवले आहेत. त्यात कोणत्याही परिस्थितीत जानेवारीपूर्वी शाळा, कॉलेज प्रत्यक्ष सुरू करू नयेत, असे त्यांनी म्हटले आहे. लस आल्यावर सर्व विद्यार्थ्यांना प्रथम लस द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

शाळा, कॉलेज सुरु करण्याबाबत हालचाली सुरु आहेत. त्याचा आढावा घेण्यात येत आहे. मात्र, थोडा उशिर झाला तरी चालेल. मात्र, लस बाजारात  येऊ द्या. नंतर शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत विचार करा. शाळा सुरु करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लस दिली पाहिजे. त्यानंतर शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात यावी, अन्यथा कोरोनाचे संकट कायम राहिले. तसेच विद्यार्थ्यांना ते धोकादायक ठरु शकते, असा गंभीर इशारा कपिल पाटील यांनी दिला आहे. त्याचवेळी त्यांनी काही सूचना केल्या आहेत. त्याचे पालन करण्यात यावे आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात न घालता क्लब अभ्याक्रमचा पर्याय त्यांनी सूचवला आहे.

राज्यातील शाळा वाढत्या कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी चर्चा महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच झाली. ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याबाबतचा आढावा घेण्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे तुर्तास शाळा या दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत देण्यात आले होते. यापार्श्वभूमीवर कपिल पाटील यांना सरकारला पत्र लिहिले आहे.

दरम्यान, देशात  १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्य सरकारला त्यांच्या राज्याची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबबात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. त्यामुळे राज्यशासनाकडून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय  जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरु होण्याबाबत विचार होऊ शकतो, तसे संकेत मिळत आहेत. ९ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे.

शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. विविध राज्यांच्या शालेय शिक्षणमंत्र्यांना त्याची अंमलबजावणी करायची आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असल्याचंही केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पालकांची संमती असेल तर विद्यार्थी शाळेत येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.