close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

किमान शरद पवारांना तरी भाजपमध्ये घेऊ नका, उद्धव ठाकरेंचा उपरोधिक सल्ला

शिवसेना-भाजप निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे.

Updated: Mar 15, 2019, 04:07 PM IST
किमान शरद पवारांना तरी भाजपमध्ये घेऊ नका, उद्धव ठाकरेंचा उपरोधिक सल्ला

अमरावती: इतर पक्षांतील नेते ज्याप्रकारे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत ते पाहता निवडणुकीपर्यंत समोर लढायला कोणी शिल्लक राहील किंवा नाही, अशी शंका वाटते. सध्या कोणावरही टीका करायची म्हटली की तो उद्या शिवसेना किंवा भाजपमध्ये येईल, अशी भीती वाटते. त्यामुळे आता भाजपने किमान शरद पवार यांना तरी पक्षात घेऊ नये, अशी मिष्किल टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते शुक्रवारी अमरावती येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य केले. हल्ली वडील एका पक्षात असतात, मुलगा दुसऱ्या पक्षात असतो. शिवसेना-भाजप निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र, अडचण इतकीच आहे की टीका नेमकी कोणावर करावी? आज ज्यांच्यावर टीका करावी ते उद्या शिवसेना किंवा भाजपमध्ये येतात. अशाने उद्या सगळेच शिवसेना किंवा भाजपमध्ये आले तर समोर कोण शिल्लक राहणार? समोर लढायला कोणीच नसेल तर निवडणुकीत गंमत उरणार नाही, असे उद्धव यांनी म्हटले. 

यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही मुक्तकंठाने तारीफ केली. नरेंद्र मोदी हे देशासाठी पंतप्रधान असतील, मात्र माझ्यासाठी ते नरेंद्रभाई आहेत. तुमच्या भावासारखी असणारी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असणे ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींचे कौतुक केले.

आता अनेकजण भाजप आणि नरेंद्र मोदींविषयी माझे इतके मनपरिवर्तन कसे झाले, असा प्रश्न उपस्थित करतील. मात्र, यापूर्वी आम्ही केलेला विरोध हा व्यक्तिगत कारणास्तव नसून जनतेच्या कामांसाठी होता. युती करतानाच या मुद्द्यांवर सहमती झाली आणि भाजपने ते मार्गीही लावले याचा आम्हाला आनंद आहे, असेही उद्धव यांनी सांगितले.