तृप्ती गायकवाड,झी मीडिया, मुंबई समाजाला खोलवर पोखरून काढलेल्या जातीपातीच्या वाळवीला नष्ट करणं त्याकाळी वाटतं तितकं सोपं नव्हतं. एकीकडे पारतंत्र्यात असलेला देश तर दुसरीकडे स्वकीयांकडूनच मिळणारी गुलामगिरीची वागणूक या कचाट्यात सापडलेल्या समाजाला वाचवण्यासाठी लेखनासारखे धारदार शस्त्र नाही हे त्यांनी ओळखलं होतं. अज्ञानाने माणूस गुलामगिरीत जगतो म्हणून आपल्यावर होण्याऱ्या अत्याचाराविरोधात लढण्यासाठी 'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा' हा मूलमंत्र त्यांनी अवघ्या जगाला दिला. शिक्षणाविषयीची त्यांची आस्था आणि समाजसुधारणेच्या ध्यासाने त्यांनी जुलमी आणि धूर्त इंग्रजांनाही झुकायला भाग पाडलं.आपल्या विरोधात समाजातील प्रत्येक जातीतल्या माणसांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर प्रयत्न करत असताना ही कोणत्याही इंग्रज अधिकाऱ्याची त्यांना अटक करण्याची हिंमत नव्हती. ज्या इंग्रजांनी भारतावर दिडशे वर्ष राज्य केलं त्याचं गोऱ्यांच्या देशात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन जागतिक शिक्षणदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
राजकारणापलीकडील कलारसिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जगण्यासाठी दोन वेळच्या जेवणाची परिस्थिती कठीण असूनही त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं नाही. त्यांच्या या समाजसुधारणेचं कार्य लक्षात घेत त्यांना वेळप्रसंगी मदत करणारी माणसं भेटत गेली. बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी कोल्हापुरचे शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचा सिंहाचा वाटा होता. बडोद्याच्या गायकवाडांनी शिष्यवृती मिळवून दिल्यावर बाबासाहेब पुढील शिक्षणाकरीता कोलंबिया विद्यापीठाकडे रवाना झाले. कोलंबिया विद्यापीठात आंबेडकरांना जॉन डेवी यांचे मार्गदर्शन मिळाले. 1930 मध्ये न्यूयॉर्क टाईम्सने बाबासाहेबांची मुलाखत घेतली होती, त्या मुलाखातीत कोलंबिया विद्यापीठातात त्यांना जॉन डेवी, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन या जाणकार प्राध्यापकांकडून अमूल्य ज्ञान आणि विद्यापिठात चांगले मित्र मिळाले. असं त्यांनी सांगितलं होतं.
1952 मध्ये कोलंबिया विद्यापिठाने डॉक्टरेट पदवी देऊन त्यांना सन्मान केला. एक गुणी विद्यार्थी म्हणून विद्यापिठात बाबासाहेबांनी त्यांची छाप सोडली. आजही या विद्यापिठाला बाबासाहेबांचा विसर पडलेला नाही. दरवर्षी न चुकता कोलंबिया विद्यापिठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आवर्जून साजरी केली जाते. मागील दोन वर्षांत कोविडकाळात कोणी कोणाच्या संपर्कात येण्यावर बंदी घालण्यात आली होती,मात्र असं असूनही विद्यार्थी संघटनेने ऑनलाईन स्वरुपात बाबासाहेबांना मानवंदना दिली होती. घरातून बाहेर पडू न शकणाऱ्यांसाठी लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. शिक्षणाच्या अवीट गोडीमुळे बाबासाहेब आंबेडकरांचं आणि कोलंबिया विद्यापिठाचं नातं अजूनही अतूट आहे.