ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास: तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhavani temple) लागू करण्यात आलेला ड्रेसकोडचा नियम अखेर मागे घेण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी किंवा पूजा अर्चा करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत, असा खुलासा तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांनी केलाय. मंदिरात प्रवेश करण्यासाठी हाफ पॅन्ट, बर्मुडा अशा वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना बंदी घालण्यात आलीय, असे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले होते. झी २४ तासनं दिवसभर ही बातमी लावून धरली. त्यानंतर तुळजापूरचे तहसीलदार आणि मंदिर व्यवस्थापकांनी नवा आदेश जारी केला. मात्र मंदिर परिसरात लावलेले फलक अजून तसेच असल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत.
तुळजापूरची तुळजाभवानी महाराष्ट्रातील तमाम भाविकांचं श्रद्धास्थान... दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी इथं येतात. मात्र देवीच्या दर्शनासाठी येताना जर तुम्ही जर तोकडे कपडे परिधान केले असतील तर तुम्हाला मंदिरात प्रवेश मिळणार नाही, असे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे मंदिरात श्रद्धा महत्त्वाची की कपडे ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात होता. झी 24 तासने हा मुद्दा लावून धरला आणि सामान्य जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अश्लील कपडे घालून आल्यास मंदीरात प्रवेश दिला जाणार नाही, असा बोर्ड तुळजाभवानी मंदिर संस्थाननं मंदिराबाहेर लावण्यात आला होता. मंदिर संस्थानच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटलेत. मंदिरात श्रद्धेच्या भावनेनं लोक येत असतात. मग दर्शनासाठी कपड्यांचे निर्बंध कशाला? असा सवाल उपस्थित केला जातोय.
दरम्यान, 2018 साली देखील नवरात्री उत्सवाच्या काळात कोल्हापूर मंदिरामध्ये अशाच आशायाचं फलक लावण्यात आलं होतं. त्यानंतर स्थानिकांच्या जोरदार विरोधानंतर फलक काढून टाकण्यात आलं होतं.
तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती म्हणून प्रसिद्ध आहे. स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला जातो.