ऑक्सिजन अभावी गुदमरतोय रुग्णांचा जीव

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Updated: Sep 13, 2020, 12:11 PM IST
ऑक्सिजन अभावी गुदमरतोय रुग्णांचा जीव title=
संग्रहित

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथील वैद्यकीय उपचार यंत्रणा कमी पडत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे. परंतु अमरावती जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णाचा सिलेंडर अभावी गुदमरून मृत्यू होत असल्याचा आरोप माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडें यांनी केला आहे.

अमरावती शहरातील सुपर स्पेशलिस्ट, डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालय, जनरल हॉस्पिटल या तीन रुग्णालयात तब्बल २५० बेड हे ऑक्सिजनचे आहे. तर खाजगी रुग्णालयात आयसीयू बेडची सांख्या १५० झाली आहे. पण रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे खाजगी रुग्णालयात देखील सिलेंडरचा तुटवडा असल्याची माहिती डॉ.अनिल बोंडें यांनी दिली.

या कोरोना काळात डॉक्टर चांगल्या पद्धतीने काम करत असले तरी त्याच्या पुढे अनेक समस्या येत असून रुग्णांना बेड मिळत नाही. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातून येणारे कोरोना आणि सारीच्या रुग्णांना वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेड वाढवण्यासाठी मागणी बोंडे यांनी केली आहे.

पंजाबराव देशमुख रुग्णालयात सारी आजारा करीता फक्त १५ बेड उपलब्ध आहे.परंतु उपचारा साठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असून त्यांना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. शासकीय रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात आयसीयू बेड व ऑक्सिजन सिलेंडर बेडची संख्या वाढवणे गरजेचं असल्याच डॉ.बोंडे म्हणाले.