प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धार्मिक उत्सवांपासून राजकारण दूर ठेवून सर्व धर्मांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याच काम झालं तर सर्व सण उत्सव शांततेत पार पडू शकतात. याचा वस्तुपाठ दोंडाईचा शहराने घालून दिलाय.
गेल्या अनेक वर्षांपासून खान्देशात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला दोंडाईचा शहरात गालबोट लागायचे. मात्र, यावर्षी दोंडाईचेकरांनी समजूतदारपणाची भूमिका घेत ईदसोबत गणपती उत्सवही गुण्या गोविंदाने साजरा केला. या सलोख्याला निमित्त ठरले ते रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल... रावल यांनी यावेळी राजकारण दोन हात दूर ठेवले.
ईदच्या निमित्तानं हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या होत्या तर गणेश विसर्जनाला मुस्लिम बांधवांनी गणेशावर पुष्पवृष्टी करून सदभाव द्विगुणित केला. यात पोलीस प्रशासनानंही आपली भूमिका चोख बजावली. दोंडाईच्याचा सात दिवसांचा गणपती उत्सव यावेळी निर्विघ्न पार पडला.
यंदा गणपती विसर्जनाची मिरवणूक सर्व धर्मियांच्या सहकार्यानं आणि मंत्री महोदयांच्या पुढाकारानं सुखरुप पार पडली. अन्य संवेदनशील ठिकाणी अश्याच संघटित शक्तीचं दर्शन होईल हीच अपेक्षा...