खडसे - पवार येणार एकाच मंचावर, चर्चांना उधाण

पक्षात नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर येत असल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. 

Updated: Dec 27, 2017, 08:33 PM IST
खडसे - पवार येणार एकाच मंचावर, चर्चांना उधाण  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : पक्षात नाराज असलेले भाजप नेते एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर येत असल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. 

एकनाथ खडसे यांचा जिल्हा असलेल्या जळगावमध्येच हा कार्यक्रम होत आहे. एरंडोलचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होतोय. 

मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी अनेकदा उघडपणे आपल्याच सरकारवर टीका केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी सरकारला टार्गेट केलं होतं... 

तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंच्या चौकशीचा झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचे सांगत खडसेंची एसीबी चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. हे सांगताना खडसे यांचे मंत्रिमंडळातील परतीचे दरवाजे बंद असल्याचंही सूचित केले होते... 

त्यामुळे भाजपात नाराज असलेले खडसे केव्हाही पक्षाचा त्याग करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. खडसे यांनी आठवडाभरापूर्वी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक पक्ष आपल्या संपर्कात असल्याचेही सांगितले होते.

त्यातच गुरुवारी ते अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकत्र येत असल्याने ही चर्चा आता अधिक तीव्र झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना बोलवण्यात आलंय. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांना या कार्यक्रमातून टाळण्यात आलंय.