राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांनी आज ते पुन्हा ठाण्यात परतणार आहेत. पण आज ठाण्यात परतण्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण गावाला का गेलो याचं कारण सांगितलं. तसंच सरकार स्थापनेसंदर्भातील घडामोडींसदर्भात भाष्य केलं.
"सत्ता स्थापन करताना गावाला यायचं नाही असा काही नियम आहे का? मी नेहमी गावी येत असतो. निवडणुका, प्रचार, दौरे झाले. महायुती प्रचंड मतांनी जिंकली आहे. लोकांनी भऱभरुन प्रतिसाद दिला असून, त्यांच्या मनातील सरकार स्थापन होत आहे. गेल्या अडीच वर्षात जे काम आम्ही केलं, त्याची पोचपावती जनतेने दिली. महाविकास आघाडीने थांबलेली कामं, प्रकल्प आम्ही पुढे नेली," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
"मी येथे आराम कऱण्यासाठी आलो होतो. अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी सुट्टी घेतलेली नाही. येथे आलो तरी जनता दरबार सुरु असतो," असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आम्ही एक इको सिस्टीम तयार केली. लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका शेतकरी या सर्वांसाठी काम केल्यानंतर लाडकं सरकार झालो. आम्ही जे काम केलं त्याचं प्रतिबिंब निवडणुकीत पाहायला मिळालं असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
महायुतीच्या योजना सुवर्णक्षरात लिहिल्या जातील. आमचा अजेंडा विकासाचा होता. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असं मी नेहमी म्हणायचो. मीदेखील एका शेतकरी कुटुंबातून आहे. त्यामुळेच मी नेहमी गावी येतो. मला येथे आलं की वेगळा आनंद मिळतो. येथे माझी लोक भेटतात, शेतात जातो असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
"जनतेच्या मनात होतं, ते मी केलं आहे. मी जनतेचा मुख्यमंत्री, सामान्य व्यक्ती म्हणून काम केलं. कॉमन मॅन समजून मी काम केल्याने त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकांची भावना साहजिक आहे. मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासह होते. मिळालेलं यश प्रचंड आहे. संभ्रम नको म्हणून मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल असं सांगितलं आहे. त्यामुळे किंतु परंतु कोणाच्याही मनात नसावा," असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
सभापती आणि गृहखातं हवं म्हणून एकनाथ शिंदेंकडून दबाव टाकला जात असल्याच्या दाव्यांवर ते म्हणाले, "याबाबत चर्चो होईल. चर्चेतून बऱ्याच गोष्टी सुटतील. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलं आहे त्यांना जी आश्वासनं दिली आहेत त्यासाठी बांधील आहोत. आम्हाला बांधिलकी जपायची आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार ते महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील जनतेने भरभरुन मतदान केलं आहे. त्यांना देण्याचा प्रयत्न असेल".
उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव समोर येत आहे, हे खरं आहे का? असं विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, "हे पाहा, चर्चा अजून सुरु आहेत. तुम्ही चर्चा करत असता. तुमच्या चर्चा खूप जास्त असतात. त्यामुळे या चर्चा आहेत. एक बैठक अमित शाह यांच्याशी झाली आहे. आता तिघांची एक बैठक होईल आणि त्यात साधक बाधक चर्चा होईल आणि त्यातून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो निर्णय घेतला जाईल.
पुढे ते म्हणाले. "जनतेने आम्हाला भरभरुन दिलं आहे. आम्ही सत्ता दिली, बहुमत दिलं असं असताना जनतेचं चांगलं सरकार स्थापन व्हावी अशी अपेक्षा असेल. आणि आम्ही जनतेला उत्तरदायित्व आहोत, विरोधकांना नाही. विरोधकांकडे आता काय काम राहिलं आहे. आमच्यात समन्वयाचा अभाव नाही. मी एकदा भूमिका स्पष्ट केल्यानंतर वारंवार करण्याची गरज नाही".