'ती वाघनखं कोणाची?' छत्रपतींचे वंशज संभाजी राजेंनाही पडला प्रश्न; म्हणाले, '2017 ला मी तिथं गेलेलो तेव्हा...'

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : 'ती' वाघनखं कोणाची? असा सवाल आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाही प्रश्न पडला आहे. त्यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवर उपस्थित केलेला प्रश्न अनेकांनाही पटला आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 6, 2023, 08:52 AM IST
'ती वाघनखं कोणाची?' छत्रपतींचे वंशज संभाजी राजेंनाही पडला प्रश्न; म्हणाले, '2017 ला मी तिथं गेलेलो तेव्हा...' title=

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : ब्रिटनस्थित व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातील ‘वाघनखे’ (Wagh Nakh) भारतात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संग्रहालयासोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji) अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरली होती, असे मानले जात आहे. मात्र अनेक इतिहासकारांनी ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असा दावा केला आहे. यावरुन आता राज्यात राजकारण पेटलं आहे. ही वाघनखं खोटी आहेत हे सिद्ध करून दाखवा असं आव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आदित्य ठाकरेंना दिले होते. दुसरीकडे आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनवरुन महाराष्ट्रात परत आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 16 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे मुंबईत आणली जाणार आहे. यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला पोहोचले आहेत. 3 ऑक्टोबर रोजी लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखे भारतात आणण्याबद्दल करार देखील करण्यात आला आहे. अशातच ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असा दावा केला जात आहे. याबद्दल आता संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही वाघनखे तीन वर्षांसाठीच आणली जाणार असल्याचे म्हटलं आहे.

"लंडन येथील संग्रहालयात असणारे वाघनखे महाराष्ट्रात तीन वर्षांच्या मुदतीवर प्रदर्शनासाठी आणले जात आहे. हे वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधावेळी वापरले असल्याचा दावा राज्य सरकार करत आहे, मात्र अनेक इतिहास तज्ञांनी त्यामध्ये दुमत व्यक्त केले आहे. 2017 साली मी याठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी तिथे लिहिलेल्या माहिती फलकावर केवळ तशी "शक्यता" असल्याचे लिहिलेले पाहण्यात आले होते.  सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा. मात्र, सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी भेट म्हणून दिलेल्या या वाघनखांस ऐतिहासिक मूल्य आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाशी निगडीत ऐतिहासिक महत्त्व असणारे हे वाघनख केवळ तीन वर्षांच्या मुदतीवरच आणले जात आहे व मुदत संपल्यावर ते इंग्लंडला परत करावे लागेल, हे वेदनादायी आहे. त्यामुळे सरकारने हे वाघनखं कायमस्वरूपी त्याच्या मूळ ठिकाणी, म्हणजेच महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न करणे अधिक गरजेचे आहे," असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

 

विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार अफजल खान याचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये केला होता. त्यावेळी महाराजांनी हातात वाघनखे लपवून त्याद्वारेच अफजल खानाचा वध केला होता हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. ही तीच  वाघनखे असल्याचे सांगितले जाते. मात्र अनेक इतिहासकारांनी ही ती वाघनखे असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर ही वाघनखे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स ग्रँड डफ तेव्हा त्यांच्या ताब्यात आली होती. ही वाघनखे डफ यांच्या वंशजांनी नंतर इंग्लडच्या वस्तुसंग्रहालयाला भेट दिली होती.