IMD Weather Forecast : यंदाच्या वर्षी पावसानं (Maharashtra News) सुरुवातीच्या दिवसांमध्ये अनेकांनाच चकवा दिला. जुलै आणि ऑगस्टचे काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसानं महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच चांगलाच जोर धरला. ज्यानंतर हा पाऊस आता ऑक्टोबरही गाजवतो का, हाच प्रश्न अनेकांना पडला. किंबहुना हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसानं तशीच हजेरीही लावली. पण, आता मात्र मुंबई, ठाणे आणि पालघर पट्ट्यातून पाऊस काहीसा कमी होताना दिसत आहे. तर, कोकणातही तो तुरळक प्रमाणात बरसताना दिसत आहे.
थोडक्यात देशातील विविध राज्यांतून पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरीही परतीच्या वाटेवर निघालेला हा मोसमी पाहुणा जाताजातासुद्धा धुमाकूळ घालताना दिसणार आहे. सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या या बदलत्या हवामानाची चिन्हं पाहायला मिळत आहेत. मुंबईत दुपारच्या वेळी तापमानाचा आकडा चांगलाच वर जाताना दिसत आहे. तर, तिथं कोकणातही दमट हवामान अडचणी वाढवताना दिसत आहे.
मराठवाडा आणि विदर्भासह सोलापूर पट्ट्यामध्ये मात्र पावसाच्या तरी तारांबळ उडवताना दिसत आहेत. तिथं कोल्हापूर आणि साताऱ्यात घाटमाथ्यावर काळ्या ढगांची दाटी होत असून, मधूनच पावसाची जोरदार सर परिसर ओलाचिंब करताना दिसतेय. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर निर्माण होणारे चक्राकार वारे आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हे बदल होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
खासगी हवामान संस्था स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या 24 तासांमध्ये पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि आरसाममध्ये पावसाची जोरदार हजेरी असेल. तर, राजस्थान, मध्य प्रदेशातून मात्र पाऊस दूर जाणार आहे. तिथं उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल तर, काही ठिकाणांवर पावसाची एखादी सर अचानकच हजेरी लावताना दिसेल. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय भागांमध्ये सध्या तापमान कमी होताना दिसत असून, थंडीची लाट देशाच्या दिशेनं येताना दिसत आहे. ज्यामुळं अतीव उंचावर असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये भुरभुरणारी हिमवृष्टीही होईल. परिणामी या भागांची नवी रुपं पाहायला मिळणार आहेत.