एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, मुलीनंतर पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स

 राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे (Ncp Leader Eknath Khadse) यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीये.  

Updated: Aug 17, 2021, 09:43 PM IST
एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, मुलीनंतर पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे (Ncp Leader Eknath Khadse) यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीये. एकनाथ खडसेंच्या मुलीनंतर आता त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना ईडीने (enforcement directorate) समन्स पाठवलं आहेत. त्यानुसार त्यांना उद्या (18 ऑगस्ट)  ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणात (pune bhosari midc land scam) हे समन्स बजावलं गेलं आहे. त्यामुळे या चौकशीदरम्यान काय होणार याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे. ( Enforcement Directorate Summons to NCP leader Eknath Khadse wife Mandakini Khadse) 
  
एकनाथ खडसेंची 9 तास चौकशी 

याआधी एकनाथ खडसे यांची जुलै महिन्यात 8 तारखेला ईडीने 9 तास केली होती. खडसेंचे जावई गिरीश चौधरींना अटक करण्यात आली. या अटकेनंतर खडसेंची ही चौकशी केली गेली होती. यावेळेस मंदाकिनी खडसेंनाही समन्स बजावलेलं. समन्सनुसार त्यांना चौकशीसाठी ईडीसमोर उपस्थित राहायचं होतं. पण मंदाकिनी खडसेंनी ईडीकडे काही दिवसांची मुदत मागितली होती. 

काय आहे प्रकरण? 

- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीचे प्रकरण

- सर्व्हे क्रमांक 52 मधील 3 एकर जागा

- ही जमीन अब्बास उकानी या नावाच्या व्यक्तीकडून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 3 कोटी 75 लाख रुपये देऊन खरेदी केली

- स्टॅम्प ड्युटी म्हणून 1 कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले. 

- या व्यवहाराची नोंदणी पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात करण्यात आली.

- ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असून ती 99 वर्षांच्या करारावर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. 

- खडसे महसूल मंत्री असताना हा व्यवहार झाल्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या पत्नी आणि जावयाने ही जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आले होते.

- या आरोपांनंतर खडसेंनी 4 जून 2016 रोजी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.