अजित पवार आणि नितीन गडकरी यांची नागपुरात भेट, या मागचे कारण जाणून घ्या

Ajit Pawar - Nitin Gadkari Met ​: महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दिवसभराच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 

Updated: Apr 30, 2022, 08:41 AM IST
अजित पवार आणि नितीन गडकरी यांची नागपुरात भेट, या मागचे कारण जाणून घ्या title=

नागपूर : Ajit Pawar - Nitin Gadkari Met : महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दिवसभराच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भेटीदरम्यान विकास कामासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील हे सुद्धा होते. सुमारे 30 मिनिटं ही भेट झाली.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या भेटीसाठी आलो होतो. मागीलवर्षी रस्त्याचे आणि विकासासाठी केंद्रीय मंत्री यांच्या विकास निधीतून निधी मिळाल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रस्त्याचे काम होऊ शकले. त्यामुळे यंदा सुद्धा नवीन वर्षात रस्त्याच्या विकासकासाठी निधी द्यावा. तसेच त्यांच्याकडे रेल्वेवर ओव्हर ब्रिज आणि रेल्वे अंडर ब्रिज यासाठी निधी आहे. त्या अनुषंगाने सुद्धा नागपूर, अमरावती, नाशिक ,कोकण रेल्वे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभाग अंतर्गत रस्त्यावर ब्रिजची गरज असेल त्याकामाची यादी तयार करुन द्यावी, असे गडकरी यांनी सांगितले.

 तसेच पुण्यातील रिंग रोडमधील काहीसा नॅशनल हायवेचा भाग असल्याने त्यासंदर्भातही भेट झाली असल्याचे अजित पवार म्हणालेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासंदर्भात सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून प्रस्ताव तयार करून राज्य सरकारच्या द्या,  राज्य सरकारच्या जीएसटीमध्ये  कन्सेशन द्या, तसेच समृद्धी महामार्ग रॉयल्टी माफ केली त्याचपद्धतीने केंद्रसरकारच्या निधीतून काम करताना सोपे जाईल, अशा पद्धतीची चर्चा झाल्याचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.