कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा विळखा, पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली

जिल्ह्यात 2019 पेक्षा जास्त पाणी पातळी वाढेल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलाय, लोकांना सतर्कतेचं आवाहन  

Updated: Jul 23, 2021, 07:49 PM IST
कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा विळखा, पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली

कोल्हापूर : राज्यात मुसळधार पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा विळखा क्षणाक्षणाला घट्ट होत आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगलीकरांचं संकट वाढलं आहे. शहरात अनेक भागात पुराचं पाणी शिरलं आहे. लोकांना मोठ्या प्रमाणावर सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पाणी वाढल्याने पुणे-बंगळुरु महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. 

पाणी पातळी वाढण्याचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. कोल्हापूर शहरासह अनेक गावांमध्ये पुराचं पाणी घुसलं आहे. जिल्ह्यात 2019 पेक्षा जास्त पाणी पातळी वाढेल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. लोकांनी सतर्क राहून सुरक्षित स्थळी जावं असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं आहे. आज रात्रीपर्यंत राधानगरी धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल.

सर्वसामान्यांसाठी पेट्रोल पुरवठा बंद

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोलचा पुरवठा बंद होणार आहे. वाढती पूर परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या वाहनांना मिळणार इंधन मिळणार आहे. पूरपरिस्थिती गंभीर होत असताना लोक विनाकारण बाहेर पडत असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत सरसकट इंधन विक्री न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सांगलीतही पावसाचं थैमान 

सांगली जिल्ह्यातही पावसानं दाणादाण उडालीय. मुसळधार पावसामुळे सांगली-इस्लामपूर आणि सांगली-वसगडे मार्गावरील संपर्क तुटलाय. सांगली बायपास रोडवर पुराचं पाणी आलय. नवीन पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आलंय. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातली आरळामधली संपूर्ण बाजारपेठ पाण्यात गेलीय. इथल्या जवळपास पन्नास घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. 

सांगलीतल्या शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातून जाणाऱ्या 25 मार्गांवर सध्या पाणी आलंय. सांगली जिल्ह्यातील 8 राज्यमार्ग आणि 17 जिल्हामार्गावर पाणी आल्याने वाहतूक खंडीत झाली आहे. त्यामुळं या ठिकाणी पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. यासाठी पोलीस आणि प्रशासन कामाला लागलंय. लोकांनीही पाण्यात गाडी घालण्याचं धाडस करु नये असं आवाहन करण्यात आलंय.