नाशिक जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन हत्या

नांदगाव तालुक्यातील वाखारीजवळील जेऊर येथे एकाच कुटुंबातील चार जणांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आल्याने नाशिक जिल्हा हादरला आहे.  

Updated: Aug 7, 2020, 12:18 PM IST
नाशिक जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन हत्या

नाशिक : नांदगाव तालुक्यातील वाखारीजवळील जेऊर येथे एकाच कुटुंबातील चार जणांची अज्ञाताकडून हत्या करण्यात आल्याने नाशिक जिल्हा हादरला आहे. चव्हाण कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या केल्याची घटना रात्री घडली. या हत्याकांडामुळे नांदगाव तालुका हादरला आहे. गळा चिरुन हत्या करण्यात आल्याने चव्हाण कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सकाळी ही बाब उघड झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी मालेगांव , नांदगाव पोलीस दाखल झाले आहेत.

नाशिकमधील वाखारी जेऊर येथे एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह चौघांची हत्या करण्यात आली. ही हत्या चोरीच्या उद्देशातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. रिक्षाचालक समाधान अण्णा चव्हाण ( ३७), भरताबाई चव्हाण ( ३२), मुलगा गणेश ( ६), मुलगी आरोही ( ४) अशी हत्या  झालेल्यांची नावे आहेत.  समाधान हे कुटुंबासह मळ्यातील घरात राहत होते. ते झोपले असताना त्यांचा झोपेतच गळा चिरण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना रात्रीची असून आज सकाळी त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले, असे पोलिसांनी सांगितले. 

चौघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले आहेत. रात्री झोपेतच गळा चिरुन त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच मालेगांव , नांदगाव पोलीस दाखल झाले आहेत. समाधान हा रिक्षाचालक आहे. तर त्याची पत्नी मोलमजुरी करुन आपला कुटुंबाचा चरितार्थ चालवत असत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे समाधानही घरीच होता. हे चव्हाण कुटुंब मळ्यातील घरात राहत होते.  या घटनेमुळे परिसरात सन्नाटा पसरला आहे. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.