कपिल राऊत, वसई : मृत्यूनंतरही इथं अवहेलना होते. गेल्या कित्येक वर्षांपासून या गावाला स्मशानभूमी नाही. वसईतल्या माजीवलीची व्यथा. मृत्यूनंतरही अवहेलना नाल्याजवळ मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. माजीवली गावातले भयाण वास्तव समोर आले आहे. दरम्यान, जागा मालकाने येथील रस्ता बंद केल्यामुळे आता तर रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.
नाल्याजवळ अंत्यसंस्कारानंतरची राख दिसत आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने असे उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ माजीवलीच्या गावकऱ्यांवर आली आहे. मात्र आता हा पर्याय देखील त्यांच्यासाठी बंद झाला. कारण या नाल्याकडे जाणारा रस्ता जागेच्या मालकानं बंद केला आहे. त्यामुळे आतातर रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत, अशी माहिती ग्रामस्थ गणपत चोगला यांनी दिली. याबाबत त्यांनी सरपंचाना जबाबदार धरले आहे.
एकीकडे हे विदारक वास्तव तर दुसरीकडे सरपंचांचं हे ठोकळेबाज उत्तर दिसून येत आहे. प्रत्येक गावात स्मशानभूमी असते मग याच गावात का नाही? किती दिवस आश्वासनांवर समाधान मानायचं? असा सवाल माजीवलीकर विचारत आहेत. निदान आतातरी माजीवली गावात मृत्यूनंतर होणारी परवड प्रशासन थांबवणार का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.