Gadchiroli News : गडचिरोली-छत्तीसगड सीमेजवळ 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. काकेरजवळ सी 60 पोलीस जवानांनी ही मोठी कारवाई केली. अलिकडच्या काळात नक्षलवाद्यांच्या विरोधातील हे सर्वात मोठं ऑपरेशन असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. बुधवारी दुपारपासूनच हे एन्काऊंटर सुरू होतं. यात 12 माओवादी नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्याचं काम पोलिसांनी केलं.
नक्षल्यांकडून मशीन गन्ससह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, या कारवाईबद्दल गृहमंत्री फडणवीसांनी पोलिसांना 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील जारावंडी पोलीस स्टेशन अंतर्गत छिंदभट्टी आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलात गडचिरोली पोलिसांचे C-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास चकमक उडाली. या चकमकीत सी-60 पार्टीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली. चकमकीत जखमी झालेल्या उपनिरीक्षक सतीश पाटील यांना घेऊन हेलिकॉप्टरने कांकेर येथून गडचिरोलीकडे आणण्यात आले.
घटनास्थळी पोलिसांचे नक्षलविरोधी अभियान सुरू असून या चकमकीत काही नक्षलवादीही जखमी झाल्याची शक्यता पोलीस विभागाने वर्तवली आहे. विशेष म्हणजे, सुरजागड इस्पात या खाजगी कंपनीच्या पायाभरणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ,उद्योगमंत्री उदय सामंत हे दक्षिण गडचिरोलीच्या याच परिसरात उपस्थित होते.
आज सकाळी 10 वाजता गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आले ज्यामध्ये 7 C60 पथकांना वांडोली गावातील छत्तीसगड सीमेजवळ पाठवण्यात आले. गावाजवळ 12-15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती.
दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत 6 तासांहून अधिक काळ अधूनमधून सुरू होता. परिसरात केलेल्या शोधकार्यात आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत 3 AK47, 2 INSAS, 1 कार्बाइन, 1 SLR यासह 7 स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. DVCM लक्ष्मण आत्राम उर्फ विशाल आत्राम, टिपागड दलम प्रभारी हे मृत नक्षल्यापैकी एक असल्याची ओळख पटली आहे. नक्षल्यांची पुढील ओळख आणि शोध परिसरात सुरू आहे. C60 चा एक PSI आणि एक जवान गोळ्या लागल्याने जखमी झाला आहे. ते धोक्याबाहेर असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.