नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : बातमी महाराष्ट्राच्या अभिमानाची... आपल्या देशात सर्वात जास्त जीआय टॅग (Geographical Indications - भौगोलिक संकेत) महाराष्ट्राकडे आहेत... आणि हे जीआय टॅग मिळवून दिलेत ते एका पुणेकरानं... आज महाराष्ट्र दिनानिमित्त एक विशेष रिपोर्ट महाराष्ट्राला सर्वाधिक जीआय टॅग मिळवून देणाऱ्या या या पुणेकराबद्दल...
पुणेरी पगडी
घोलवडचे चिकू
जळगावची केळी
पैठणी साडी
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी
नाशिकची द्राक्षं
सांगलीचे बेदाणे
वेंगुर्ला काजू
रत्नागिरीचं कोकम
कोल्हापूरचा गूळ
पुण्याचा आंबेमोहोर तांदूळ
हे सगळं अस्सल आपल्या महाराष्ट्राचं... विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत तयार होणाऱ्या या पदार्थांना आणि वस्तूंना जीआय टॅग दिला जातो. त्या जीआय टॅगसाठी ऐतिहासिक आणि विज्ञाननिष्ठ पुरावे द्यावे लागतात. महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या अशा तब्बल २८ पदार्थ आणि वस्तूंना जीआय मानांकन मिळवून दिलंय पुण्याच्या गणेश हिंगमिरे यांनी... महाराष्ट्रातून पहिला जीआय टॅग मिळाला पुणेरी पगडीला... ते साल होतं २००८...
एकेकाळी महाराष्ट्र असे जीआय टॅग मिळवण्यात मागे होता... पण आता देशात सर्वाधिक जीआय टॅग महाराष्ट्राकडे आहेत... आणि हे शक्य झालंय हिंगमिरे यांच्या प्रयत्नांनी...
महाराष्ट्रातल्या २८ वस्तूंना जीआय टॅग मिळाला असला तरी अजूनही कास पठारावरची निसर्गसंपदा, सातारचे कंदी पेढे, लोणावळ्याची चिक्की यांना जीआय टॅग मिळवून देण्याचा हिंगमिरे यांचा प्रयत्न आहे.
जीआय टॅग अर्थात बौद्धिक संपदा हक्क, जीआय टॅगिंग आणि पेटंट या विषयात हिंगमिरे २००४ पासून काम करत आहेत. महाराष्ट्राचा हा अभिमान महाराष्ट्रानं मिरवावा, यासाठी त्यांनी इंग्लंडमधली मोठ्या पगाराची नोकरीही सोडून दिली. आता महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरांना जीआयच्या रुपानं आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे... त्यांच्या या प्रयत्नांना शुभेच्छा...