आतिष भोईर, कल्याण : कल्याण पूर्वेतील अल्पवयीन तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. या मानसिक आणि शारीरिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आठ आरोपींना कोलसेवाडी पोलिसांनी अटक केली होती.
आरोपींची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपुष्टात आल्याने त्यांना पुन्हा आज कल्याण न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत आणखीन चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. नवीन तपासातून 376 ( ड ) चा सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी दिली आहे.
आत्महत्येस प्रवृत्त करणे, पोक्सो आणि आता या आरोपींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.