शिक्षकाकडून व्हिडिओ व्हायरल झाल्यावर विद्यार्थिनीची आत्महत्या

भीतीपोटी केली आत्महत्या 

Updated: Dec 7, 2019, 08:34 PM IST
शिक्षकाकडून व्हिडिओ व्हायरल झाल्यावर विद्यार्थिनीची आत्महत्या  title=

जयेश जगड, झी मीडिया, वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपिर येथील कनिष्ठ महाविद्यालयात अजब प्रकार घडला आहे. नोट्स घेण्याकरता भेटलेल्या तरूण मुला-मुलीचा व्हिडिओ बनवण्यात आला. यानंतर हा व्हिडिओ शिक्षकाकडून व्हायरल करण्यात आला. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर बदनामी आणि मानसिक छळाला कंटाळून एका तरूणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. 

मित्राकडे नोट्स मागत असतानाचा एका मुलीचा व्हिडिओ एका स्वयंघोषित समाजसेवकाने बनवला. मात्र हाच व्हिडिओ मुलीच्या जीवावर बेतला आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या शौचालयाजवळील हा व्हिडिओ मोबाइलमध्ये चित्रित करण्यात आला. त्यानंतर या व्यक्तीने व्हिडिओ घरी दाखवण्याची धमकी देऊन मुलांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. 

शूट केलेला हा व्हिडिओ घरी दाखवण्यासाठी वर्ग शिक्षकांनी मुलीच्या काकांच्या परिचीत व्यक्तीला पाठवला. या व्यक्तीने तो व्हिडिओ मुलीच्या काकांना न दाखवता सोशल मीडियावर व्हायरल केला. बदनामी आणि मानसिक छळच्या दबावाखाली आलेल्या तरुणीने शेवटी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

घटना संवेदनशील असल्याने या प्रकरणात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात व्हिडिओ काढणारा व्यक्ती, व्हिडिओ वायरल करणारा व्यक्ती आणि शाळेतील शिक्षकाला असे एकूण तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांनी दिली आहे. 

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. व्हायरल व्हिडिओच्या भीतीने तरूणीने आत्महत्या केली असून तिचा यामध्ये नाहक बळी गेल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.