धक्कादायक : कुठे गायब होतायत नाशिकमधल्या मुली-महिला?

नाशिक शहर आणि ग्रामीण भागात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलंय. गेल्या चार वर्षांत तब्बल अडीच हजारांहून अधिक महिला बेपत्ता असल्याची नोंद आहे. 

Updated: Aug 1, 2017, 10:55 PM IST
धक्कादायक : कुठे गायब होतायत नाशिकमधल्या मुली-महिला? title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहर आणि ग्रामीण भागात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलंय. गेल्या चार वर्षांत तब्बल अडीच हजारांहून अधिक महिला बेपत्ता असल्याची नोंद आहे. 

मानसिक तणाव, घरातले बिघडत जाणारे स्वास्थ्य, पालकांशी कमी होणारा संवाद, पती-पत्नीमध्ये उडणारे खटके, सासरच्या मंडळींकडून होणारा छळ अशा अनेक कारणांमुळे नैराश्य येऊन आत्महत्यासारख्या घटनांमध्ये वाढ होतेय. त्याचबरोबर महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय.

गंभीर बाब म्हणजे यात अल्पवयीन मुलींची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या चार वर्षात नाशिक जिल्ह्यात 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 हजार 702 महिला बेपत्ता झाल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय. यात शहरात साधारणतः 1 हजार 351 महिला आणि 135 अल्पवयीन मुलींचा सहभाग आहे. ग्रामीण भागात 1 हजार 17 महिला आणि 199 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. 

त्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या माध्यमातून ऑपरेशन मुस्कान, पुन्हा घरी असे विविध उपक्रम राबविले जातायत. निर्भया पथक आणि बीट मार्शलच्या माध्यमातून महिलांना मदत केली जातेय, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिलीय.  

सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे शाळा आणि कॉलेजच्या मुली अपप्रवृत्ती असणाऱ्या लोकांच्या जाळ्यात ओढल्या जातायत. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईट आणि व्हॉट्स अॅपचा सावधगिरीने वापर करावा तसंच पालकांनी मुलींमध्ये विश्वासाचे नातं निर्माण करावं, असा सल्ला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय. यासाठी शाळा कॉलेजमध्ये समुपदेशनही करण्यात येतंय. 

महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून 9762100100 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आलीय. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्जच्या माध्यमातून हेल्पलाईन नंबर मुलीपर्यंत पोहचवला जाणार आहे. मात्र मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी खबरदारी घेणं आणि हरवत चाललेला संवाद पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे.