पूरग्रस्तांना जीवनावश्यक ती सर्व मदत तातडीने द्या - विधानसभाध्यक्ष नाना पटोले

अचानक उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे चंद्रपूर आणि भंडारा जिल्हा प्रशासन बचाव आणि शोध कार्यात सज्ज .

Updated: Sep 1, 2020, 08:46 AM IST
पूरग्रस्तांना जीवनावश्यक ती सर्व मदत तातडीने द्या - विधानसभाध्यक्ष नाना पटोले  title=

भंडारा : अचानक उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे चंद्रपूर आणि भंडारा जिल्हा प्रशासन बचाव आणि शोध कार्यात सज्ज असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य  आपत्ती दलाच्या सहकार्याने जिल्ह्यातील ४२०० कुटुंबातील १८ हजार लोकांना तात्पुरत्या शिबीरात हलविण्यात आले आहे. या शिबीराला  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी  भेट दिली. तसेच भंडारा शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी सुद्धा केली.

चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर 

तात्पुरत्या शिबीरातील नागरिकांची अँटीजेन तपासणी करणे, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, भोजनाची व्यवस्था करणे यासाठी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना नाना पटोले व विश्वजीत कदम यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजु कारेमोरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व अधिकारी उपस्थित होते.

भंडारा शहर ५, भंडारा ग्रामीण २३, पवनी २२ तुमसर ५, मोहाडी ६ व लाखांदूर २ असे तात्पुरते शिबीर उभारण्यात आले आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे १६३ सदस्य विविध भागात ३० बोटीच्या साहाय्याने पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी पोहचवित आहेत. आता पाणी वाढणार नसून नागरिकांनी घाबरुन न जाता सहकार्य करावे. प्रत्येक नुकसानग्रस्ताला मदत केली जाईल, अशी ग्वाही या बैठकीत देण्यात आली.

राज्य प्रतिसाद दलाच्या २ चमु जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. मोठया प्रमाणात शोध व बचाव कार्य सुरु आहे. जिल्ह्यात २ हजार ६४५ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. भंडारा शहरात निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांच्या  मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असून अभिषेक  नामदास यांनी बचाव व शोध कार्यांतर्गत १५० कुटुंब सुरक्षित ठिकाणी पोहोचविले असून आपत्तीत सापडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.

जवाहर नगर-पिंपरी येथे एसडी आरएफ पथकाद्वारे ६०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच मोहाडी व तूमसर तालुक्यात एसडीआरएफच्या दुसऱ्या चमुद्वारे ७०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. सदरच्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी व सर्व तहसीलदार यांनी मागील ३६ तासादरम्यान शोध व बचाव कार्य करुन परिस्थितीवर प्रशासन नजर ठेवून आहे.सर्वांना तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था व भोजन देण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाद्वारे व्यवस्था केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ११ बोटद्वारे शोध व बचाव कार्य करण्यात येत आहे.

भंडारा जिल्हा पूरपस्थिती सद्यस्थिती भंडारा जिल्ह्यात एकूण ३८११ कुटुंब बाधित झाली आहेत. यात नुकसानग्रस्त व्यक्ती १३  हजार ८११ असून आपत्ती केंद्र २४ आहेत. तर पवनी तालुक्या-मांगली चौरासमधील एकूण १४७९ कुटुंब  बाधित असून नुकसानग्रस्त व्यक्ती ७२७४ आहेत. येथे आपत्ती केंद्र २७ आहेत.

तुमसर तालुकात एकूण १२७ कुटुंबाना मोठी छळ बसली असून नुकसानग्रस्त व्यकती ५२८ असून आपत्ती केंद्र ५ आहेत तर मोहाडी तालुक्यात एकूण ६ हजार ४२६ कुटुंब असून नुकसानग्रस्त व्यक्ती २६ हजार ४ आहेत. आपत्ती केंद्र ७८ आहेत.