दुष्काळी लातूर जिल्ह्यावर पाऊस मेहरबान, पाणीसाठा दुप्पट

 Rain in Latur : दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यावर यावर्षी पावसाची चांगलीच मेहरबानी झाली आहे. 

Updated: Sep 14, 2021, 11:07 AM IST
दुष्काळी लातूर जिल्ह्यावर पाऊस मेहरबान, पाणीसाठा दुप्पट
प्रातिनिधिक फोटो

लातूर :  Rain in Latur : दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यावर यावर्षी पावसाची चांगलीच मेहरबानी झाली आहे.  (Good rain in Drought Latur) ७०२ मिमी इतकी वार्षिक सरासरी असताना यावर्षी आतापर्यंत ७२५ मिमी इतक्या पावसाची नोंद झालीय. परिणामी जिल्ह्यातील विविध प्रकल्पात जवळपास ६९५ दलघमी इतका पाणीसाठा झाला आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा दुप्पट असून जिल्ह्यातील ५७ प्रकल्प हे तुडुंब भरलेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जिल्ह्याच्या सिंचनाची चिंता मिटलीय. ज्यात मांजरा आणि तेरणा धरण हे ९० टक्के इतके भरलेत. आठ मध्यम प्रकल्पापैकी रेणा, तिरु, देवर्जन आणि साकोळ प्रकल्प शंभर टक्के भरलेत. जिल्ह्यात आणखी परतीचा पाऊस शिल्लक असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 

लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळं आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे मोठं नुकसान झाले आहे. अनेक तालुक्यातील शेकडो हेक्टर ऊस हा भुईसपाट झाला आहे. तर सर्वाधिक पीक असलेल्या सोयाबीन पिकात पाणी साचल्यामुळे सोयाबीनच्या नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

गंगापूर येथील ऊस उत्पादक शेतकरी सोनेराव देशमुख यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यांनी त्यांच्या अडीच एकर शेतात लावलेला ऊस हा अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाला आहे. या ऊसातून चांगल्या नफ्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र गेल्या चार दिवसापासून झालेली अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याने त्यांच्या या अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत.