रत्नागिरी : कोकणात जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात संततधार पाऊस पडत आहे. यामुळे पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरीत चिपळूण येथील वाशिष्ठी नदी आणि खेड येथील जगबुडीला पूर आला आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिपळूणच्या वाशिष्टी नदीवरील पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. कारण वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीत आणखी वाढ झाली आहे.
तर खेड - दापोली मार्गावर खेडनजीक एकविरानगर येथे रस्त्यावर नारंगी नदीच्या पुराचे पाणी साचल्याने मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. खेड बहिरवली मार्गावर सुसेरी मार्गावर रस्त्यावरून पाणी जात असल्याने खेडमधील खाडीपट्टा विभागातील २० गावांचा संपर्क तुटला आहे.
मुंबई गोवा महामार्ग आणि खेडमधील अंतर्गत रस्ते बंद असल्याने अनेक प्रवासी खेड बस स्थानकात अडकून आहेत. पावसामुळे त्यांना रात्र एसटी स्थानकात काढावी लागत आहे. खेड शहरातील मच्छी मार्केट परिसरात जगबुडी नदीचे पाणी शिरल्याने ८ ते १० दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे व्यापारी धास्तावले आहेत. काहीनी दुकानातील सामान हलविले आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिला तर व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तर रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. दुपारपासून दक्षिण रायगडात पावसाचा जोर वाढलाय. महाड, माणगाव, तळा, पोलादपूर, म्हसळा भागात जोरदार पाऊस कोसळतोय. सावित्री आणि गांधारी नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झालीये. मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.