मुंबई: राज्यात थंडीतही मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस काही पाठ सोडायचं नाव घेत नाही. नोव्हेंबर महिना अर्धा उलटला तरीही पावसाचं थैमान काही संपेना. पुन्हा एकदा पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबई-ठाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसानं हजेरी लावली होती. तर पुढेचे 4 दिवस विजांच्या कडकडाटासह पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाण्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस पावसाचे राहातील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पुढचे 4 दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 18 ते 21 नोव्हेंबर दरम्यान हा पावसाचा अंदाज IMD कडून वर्तवण्यात आला आहे.
बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये 20 आणि 21 नोव्हेंबरला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे.
कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ हे कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्याचा परिणाम म्हणून पाऊस पडत असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. किनाऱ्याजवळ हे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ते पुढे सरकण्याची शक्यता आहे. कोकणपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.