राज्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरुच

विदर्भातील अनेक भागात सलग तिस-या दिवशी पाऊस.. गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान

Updated: Mar 21, 2021, 08:29 AM IST
राज्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरुच  title=

मुंबई : वाशिम जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखामंगरुळपिर तालुक्यात वादळी वा-यासह पावसाचं थैमान शेलुबाजार परिसरात तुफान  त्याचप्रमामे गारपिट देखील झाली. पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. अवकाळी पावसामुळे बळीराज मात्र त्रस्त झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. 

बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला, बीड जिल्ह्यातील माजलगाव वडवणी आणि गेवराई तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण अधिक होतं. एवढंच नाही तर या तिन्ही तालुक्यांमध्ये गारपीटही झाली. माजलगाव तालुक्यातील राजेगाव या गावांमध्ये जोरदार गारपीट झाली तर  वडवणी तालुक्यातील  परडी माटेगाव  तसंच गोविंद वाडी  या भागांमध्ये  गारपीट झाली. पाऊस आणि गारपिटीनं पिकांसह फळबागांचे मोठं नुकसान झालं. 

अकोला जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर भागातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झालं. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, फुलशेती आणि फळबाग पिकाला फटका बसण्याची चिन्ह आहेत. 

धुळे आणि नंदुरबार शहरासह दोन्ही जिल्ह्यात  गारपीट झाली शिवाय मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याने खान्देशात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. धुळे शहर, नंदुरबार शहर, साक्री, पिंपळनेरसह अनेक  ठिकाणी बेमोसमी पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित झाला. धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. 

दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही भागात गारपीट झाली आहे. चाळीसगाव, भडगाव भागातही मेघगर्जनेसह पाऊस बरसला. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचं नुकसान झालं आहे. वीस ते बावीस मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

येवल्यातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पावसासह गारपीटही झाली आहे. त्यामुळे द्राक्ष, कांदा आणि गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत आणि पिसरातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान लवकरात लवकर नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

मनमाडमध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कांदा आणि गव्हाच्या पिकाचं नुकसान झालं आहे.बागलान मोसम खोरे परिसरात पाऊस बरसला. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा आणि गव्हाच्या पिकाचं नुकसान झालं आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा पाऊस झाल्यामुळे शेतकरी पार रडकुंडीला आला आहे.