Monsoon Update | पावसामुळे राज्यभरातील धरणं तुडूंब! पुढील दोन महिने असे असेल पर्जन्यमान

Monsoon Update | जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्य सुखावलं असून बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

Updated: Jul 25, 2022, 09:05 AM IST
Monsoon Update | पावसामुळे राज्यभरातील धरणं तुडूंब! पुढील दोन महिने असे असेल पर्जन्यमान title=

मुंबई : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्य सुखावलं असून बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तर धरणांच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. असं असलं तरी ऑगस्ट महिन्यात 10 ते 12 दिवस पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे. तर पुढील 2 महिने मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तीनदा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला असून, यामुळे राज्यात यंदाचे पर्जन्य दिलासादायक असणार आहे.

मुंबई
मुंबईकरांसाठीही खूशखबर असून मुंबईची तहान भागवणार अप्पर वैतरणा धरण 80 टक्के भरले आहे. अप्पर वैतरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 610 क्युसेक पाणी वैतरणातून सोडलं जातंय. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

वर्धा
वर्ध्यात दमदार झालेल्या पावसामुळे धरणं ओव्हरफ्लो झाली आहे. रिधोरा धरणही भरलं असून, पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इथल्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केलीय.

जळगाव
जळगावातील यावलमधील निंबा देवी धरणावर पर्यटकांची गर्दी होत आहे. दुर्घटना टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. तरीदेखील पर्यटक शासन आदेशाला केराची टोपली दाखवत धरणावर मनमुराद आनंद घेत आहेत. 

विदर्भ
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे असलेल्या अप्पर वर्धा धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुन्हा अप्पर वर्धा धरणाचे तेराही दरवाजे उघडण्यात आले आहे.  तेराही दरवाजे उघडल्याने धरणावर असलेली विद्युत रोषणाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रंगीबिरंगी विद्युत रोशणाईमुळे अप्पर वर्धा धरणाचे विहंगम दृश्य दिसतंय.