नवी मुंबई : राज्यात धो धो पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर काहींच्या घरातही पाणी घुसले आहे. मुसळधार पावसाचा रस्ते वाहतुकीलाही फटका बसला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे. नवी मुंबईतही अनेक ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत तर काही ठिकाणी रस्ते खचल्याच्या घटना घडल्या आहेत. तर मुसळधार पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडले आहे. लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे. प्रवाशांची रेल्वेलाईनमधून पायपीट सुरु आहे. पावसानं उसंत घेतल्यानं रेल्वेरुळावरचं पाणी ओसरत आहे. तर नवी मुंबईत पावसात अडकलेल्या 375 जणांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. आर्टिस्ट व्हिलेज धबधब्यात अडकलेले 200 पर्यटक, तर अडवली-भूतवलीच्या ओढ्यापलीकडे शेतकरी अडकले होते.
पर्यटनास बंदी असताना मोठ्या प्रमाणात नागरीक धबधब्याखाली पावसाचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. सीबीडीमधील आर्टिस्ट व्हिलेज येथील धबधब्यात 200 पर्यटक अडकले होते त्यांना पोलिसांनी अग्नीशमन दलाच्या मदतीने रविवारी सायंकाळी बाहेर काढले.बंदी असताना हे पर्यटन येथे आले होते. परंतु पाणी वाढल्याने ते अडकून पडले होते. तर अडवली भूतवली येथे शेतात काम करायला गेलेले शेतकरी आणि पर्यटक अशा 125 जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे. ओढ्याचे पाणी वाढल्याने या शेतकऱ्यांना ओढ्याच्या पलीकडे येणे शक्य नसल्याने अग्नीशमन दलाने अडकलेल्या शेतकऱ्यांना दोरीच्या सहाय्याने रेस्क्यू केले.
नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने ठाणे बेलापूर मार्गावर पाणी साचले आहे याचा परिणाम वाहतुकी वर झालेला आहे. महापे येथे भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्याने हा भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गात अवजड वाहन बंद पडले आहेत. यामुळे वाहतूक बंद असून वाहतूक वळवण्यात आली आहे. दोन्ही मार्गावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मध्य रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग ते विक्रोळी दरम्यान रेल्वेरुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे ठाणे सीएसएमटी लोकल वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र पावसानं उसंत घेतल्यामुळे रेल्वे रुळावरील पाणी ओसले. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. सध्या मध्ये रल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरु आहे. हार्बर, ट्रान्स हार्बर लाइनवर वाहतूक सध्या सुरु आहे. दरम्यान मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने एकापाठोपाठ एक लोकल उभ्या राहील्या होत्या. त्यामुळे भायखळ्या स्टेशन जवळ अनेक प्रवाशांनी रुळावरून स्टेशन गाठण पसंत केले.
ठाण्यातला मासुंदा तलाव भरून वाहू लागलाय. तलावाच्या बाहेर पाणी आले आहे. तर दुसरीकडे नालेसफाई योग्य झाली नसल्यामुळे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे ठाणे पालिकेची पोल खोल झाली आहे. आज सकाळपासून कल्याण डोंबिवली मध्ये पावसाची रिपरिप सुरू होते मात्र तासाभरापासून पावसाने चांगला जोर धरलाय . तासाभराच्या पावसातच डोंबिवली स्टेशन परिसरातील नेहरू रोड परिसरात पुन्हा एकदा पाणी साचल्याने दुकानामध्ये पाणी शिरले होते.
अंबरनाथमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय. अंबरनाथच्या प्रचिन शिवमंदिरातही पाणी शिरले. अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे. आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इथे मोठा प्रवाह निर्माण झाला आहे. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेर तर या नदीने अक्षरशः रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळालं.
बदलापूर शहराजवळून वाहणारी उल्हास नदी सध्या दुथडी भरून वाहते आहे . लोणावळा आणि कर्जत परिसारात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस झाल्याने उल्हास नदीच्या पाणी पाणीपातळीत वाढ झाली आहे . सावधगिरी म्हणून नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बदलापूर शहरात गेल्या 24 तासात 137 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातही पावसाची दमदार हजेरी दिसून येत आहे. औराद शहाजनीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस तर बीड जिल्ह्यात लेंडी नदीला पूर आला आहे. तर, अमरावतीत हजारो हेक्टर पिकं पाण्याखाली गेले आहे.