औरंगाबाद / बीड : Heavy rains in Maharashtra : मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात अहमदनगरमध्येही ( Ahmednagar) चांगला पाऊस आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) सोयगाव तालुक्यतील बनोटी येथे हिवरा नदीला पूर आला आहे. त्यामुळे गावाचा पूल वाहून गेला असून गावाचा संपर्क तुटला आहे. नदीला सध्या पुर असल्याने गावातही पाणी घुसले आहे. पाऊस सुरू आहे आणि पूल ही वाहून गेल्याने मदत कार्य करण्यास अडचणी येत आहेत. ( rains in Maharashtra)
बीड जिल्ह्यात काही भागात मध्यरात्री जोरदार पाऊस कोसळत आहे. कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कुंडलिका आणि माणिकर्णीक नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने नदी काठावरील गावांना इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, काल हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली काही भागात तर जोरदार पाऊस झाला या पावसामुळे काही भागातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. माजलगाव तालुक्यातील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. राजेवाडी येथील बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. कुंडलीका नदीला पावसामुळे अक्राळविक्राळ रूप आल्याचं पाहायला मिळत आहे तर बीड तालुक्यातील आंबेसावळी येथील मनकर्णिका नदीला पूर आला आहे. मागील अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. बीड जिल्ह्यातील काही भागात मोठा पाऊस झाला तर अजूनही बीड जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून शेतीतील पीक आणि पशुधन मोठ्या प्रमाणात वाहून गेले असल्याची शक्यता आहे.
अखेगाव भागात असलेल्या नंदिनी नदीला मोठा पूर आला असून नदीचा कडेवर असलेल्या आखेगाव, येळी, कोरडगाव, खरडगाव, भगूर या गावात पाणी साचले आहे. पाण्याचा स्थर 5 ते 7 फुट असल्याने या गावातील काही ग्रामस्थ निवारण्यासाठी दुसऱ्यांच्या घरावरील गच्चीवर आश्रय घेत आहेत.
काहीकाळ विश्रांती घेतल्यानंतर मुंबईजवळील कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. पुढील 2-3 दिवस ठाणे जिल्ह्यांसाह महाराष्ट्रच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानूसार आज सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीत पावसाच्यामध्येच जोरदार तर मध्येच हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.