कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

कोकणात आज मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पासवाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.  

Updated: Oct 16, 2020, 06:43 AM IST
 कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता  title=

मुंबई : कोकणात आज मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पासवाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्राच्या दिशेने निघालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला चांगलाच फटका बसला आहे. 

दरम्यान आज काही ठिकाणी मुसळधार ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा कमी दाबाचा पट्टा गुजरातच्या किनारपट्टीवर जाणार आहे. त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान आज मुंबई ठाणे आणि पालघरसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

गेले दोन ते तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. याचा फटका जास्त करुन पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली जिल्ह्याला बसला आहे. शेतीबरोबरच घरांचेही नुकसान झाले आहे. अनेक पीकांना या परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातही या पावसाने जोरदार दणका दिला आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी हळहळू ओसरु लागले आहे. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.