नाशिक : हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने त्याचे दुष्परीणामही दिसू लागत आहे. सध्याच्या तरुणाईला सेल्फीचे वेड जडले आहे. याचा त्रास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही जाणवू लागला आहे.
मला भेटायला आलेले बहुतांशजण मुद्द्याच बोलायच सोडून आधी मोबाईल कॅमेऱ्यातून सेल्फी काढत राहतात असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मी राष्ट्रपतींची भेट घेणार आहे आणि मला एक खून माफ करा अशी विनंती करणार आहे असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे सध्या नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या दुष्परिणामांची कार्यकर्त्यांना जाणीव करुन दिली. 'मी बाहेर निघताना कोणीही फोटो काढायला आणि सेल्फी घ्यायला येऊ नका, असा दम त्यांनी यावेळी भरला.
राज यांच्या चर्चेनंतर कोणीही सेल्फीसाठी त्यांच्याजवळ आले नाही.
मला एक खून माफ करा अशी मी राष्ट्रपतींकडे मागणी करणार असल्याचे यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले. मोबाईल कॅमेरा ज्याने बनवला त्याचा हा खून असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. राज यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला.
अर्थात, राज यांनी हे वक्तव्य मिश्किलमध्ये केले असले तरी सभागृहातील मनसे कार्यकर्त्यांनी लागलीच आपला मोबाईल खिशात ठेवला.
दरम्यान फेरिवाला मारहाण आणि मनसे कार्यकर्त्यांना दिलेल्या नोटीसा या पार्श्वभूमीवर नाशिक येथील सभेत राज ठाकरे मोठा गौप्यस्फोट करतील अशी आशा व्यक्त केली जात होती.