Manoj Jarange On Maratha Reservation : मनात आणले तर सरकार एका दिवसात आरक्षणाचा GR काढू शकतं अस मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हंटल आहे. यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला यावर उपया देखील दिला आहे. सरकारला कायदा बनवण्याचा अधिकार आहे. यामुळे वटहुकूम जारी करुन सरकाने निर्णय घ्यावा असे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले आहे.
जालना येथील मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. त्यांनी सरकारला मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी राज्य सरकारला 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला. त्यानंतर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. जालना मराठा आरक्षण आंदोलनात जरांगेंच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे.
दरम्यान, आज मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मराठा समाजाची भूमिका मांडली. सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन पुन्हा भेटायला येतो असे सांगून गेले होते. आता मात्र, मराठा आरक्षणासाठी सरकारचं शिष्टमंडळ आमच्या भेटीला येईल ही अपेक्षा आम्ही सोडून दिली आहे. आम्ही सरकारला नाही तर सरकारच आम्हाला वेठीस धरत आहे.
जे काही पुरावे हवे आहेत ते सरकारने आमच्याकडून घ्यावेत आणि मराठा आरक्षणासाठी तत्काळ अध्यादेश काढावा अशी मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी केलीय. सरकार जिथून पुरावे घेणार तेच पुरावे आमच्याकडे आहेत त्यामुळे सरकारचा वेळ वाचेल अशी सूचनाही जरांगे यांनी केलीय. राज्य सरकारला कायदा बनवण्याचा अधिकार आहे. त्यांनी राज्यपालांची परवानगी घेऊन तत्काळ वटहुकूम काढावा असंही जरांगेंनी म्हंटलंय. हैदराबादपासूनचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. रिक्षा डंपर भरतील इतके पुरावे माझ्याकडे आहेत. चार दिवसांचा वेळ दिला होता त्यात कॅबिनेट बैठकही झाली. सरकारचा वेळ वाचवण्यासाठी एका दिवसात पुरावे देऊ. राज्यपालांचा परवानगी घेऊन सरकारने अध्यादेश काढावा. वटहुकूम जारी करुन सरकाने निर्णय घ्यावा. आवश्यकता असल्यास आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठीही तज्ज्ञ देण्याचीही मराठा समाजाची तयारी आहे असे जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडलीय. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. जरांगेंची प्रकृती बिघडल्याने त्यांना सलाईन लावण्यात आलंय. जीआर काढल्याशिवाय उपोषण मागे घेतलं जाणार नाही यावर जरांगे ठाम आहेत. अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना जरांगे पाटील यांच्या भेटीला दाखल झालेत. त्यांनी उपोषणकर्ते जरांगे पाटलांची विचारपूस केली. लाठीमारातल्या दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.